मिलिंद कुलकर्णीजून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पदार्पण करताना खान्देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जळगावात २२००, धुळ्यात ५०० व नंदुरबारात ८० च्या घरात रुग्णसंख्या पोहोचली आहे. मृत्यूदरदेखील चिंतेचा विषय आहे. त्यादृष्टीने आता कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. केंद्रीय समितीने जळगावात भेट देऊन पाहणी केली, अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. मध्यंतरी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनीही जळगावसह ४५ पालिकांच्या कार्यक्षेत्राचा आढावा घेतला होता. त्यांच्या व अलिकडे आलेल्या पथकाच्या सुचनांमध्ये साम्य आहे. त्याकडे झालेल्या दुर्लक्षाचे परिणाम संपूर्ण खान्देशाला भोगावे लागत आहे. कोरोनाचा संपूर्ण जगात उद्रेक झाल्याने आणि त्यावर प्रतिबंधात्मक औषध अद्यापही उपलब्ध नसल्याने दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक होते. ज्येष्ठ नागरिक आणि पूर्वीपासून ठराविक आजार असलेल्या लोकांना धोका असल्याने त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता होती. परंतु, महानगरांपासून छोट्या गावांपर्यंत वैद्यकीय व्यावसायिकांनीही भीतीपोटी, सुरक्षा उपाय नसल्याने वैद्यकीय सेवा सीमित किंवा बंद केली. सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा जगजाहीर असल्याने तिकडे वळणाºया लोकांना अभाव आणि कमतरतांचा मुकाबला करावा लागतो. खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचे योग्य व्यवस्थापन व नियोजन जिल्हा प्रशासन व वैद्यकीय-आरोग्य प्रशासनाने केले असते, तर हा उद्रेक रोखता आला असता. नेमक्या याच त्रुटीवर केंद्रीय पथकाने बोट ठेवले आहे. कोरोनाची भीती आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील रुग्णालयांची एकूण अवस्था यामुळे रोगाची लक्षणे दिसत असूनही रुग्ण उपचाराला विलंब करीत असल्याचे दिसून आले आहे. रुग्णवाहिकांअभावी काहींना वेळेवर उपचार मिळू शकले नसल्याची तक्रार अधूनमधून येत आहे. राजकीय, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिका नेमक्या गेल्या कुठे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. झोपडपट्टी व दाट वस्तीत गांभीर्याने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता केंद्रीय पथकाने व्यक्त केली आहे. सर्वेक्षणाचे गांभीर्य हरवले आहे. उपचार म्हणून सर्वेक्षण केले जाते. त्याला आरोग्य सेवक आणि नागरिकदेखील जबाबदार आहेत. दोघांनाही कोरोनाची भीती वाटत असल्याने एकमेकांना टाळले जात आहे. वैद्यकीय व महसूल यंत्रणेचे प्रमुख आता नवे आहेत, जुन्या झालेल्या चुका दुरुस्त करुन पुढे जाण्यासाठी त्यांना आता प्रयत्न करावे लागतील. केंद्रीय व राज्य सरकारच्यादृष्टीने जळगावची बिकट स्थिती चिंतेचा विषय आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे स्वत: येऊन गेले. राज्यातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी याठिकाणी पाठविले आहे. परिचारिकांचा चमू दिला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना आता करायला हव्यात.जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूदर अद्यापही चिंताजनक आहे. वैद्यकीय अधिष्ठाता, जिल्हाधिकारी यांच्यासह नवीन चमू युध्दाला सज्ज झाला आहे.अभिजित राऊत, डॉ.रामानंद यांनी अशा परिस्थितीत कार्यभार हाती घेतला आहे, की त्यांना कठोर पावले उचलल्याशिवाय गत्यंतर नाही. दोघेही अनुभवी अधिकारी आहेत. दोघांची दिशा निश्चित आहे. मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी प्रयत्न सुरु केले आहे , तर आरोग्य यंत्रणा तंदुरुस्त करण्यासाठी अधिष्ठात्यांनी कार्यवाही सुरु केली आहे.
यंत्रणेतील त्रूटी दूर करण्याचेच आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:22 PM