लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एक जण बाधित आढळून आल्यानंतर त्याचे कुटुंबिय वगळता ती व्यक्ती कोणाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आली याची माहितीच न घेता संबधितांची तपासणीच होत नसल्याचे चित्र मध्यंतरी होते. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचा तर्क लावला जात आहे. दरम्यान, याबाबत काही तथ्थ्यांची पडताळणी केली असता हे गंभीर चित्र समोर आले आहे.
जिल्ह्यात १८ सप्टेंबरपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरीकडे झुकल्याचे समाधानकारक चित्र होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. यात सुरूवातीला प्रत्येक रुग्णामागे किमान आठ हायरिस्क आणि दहा ते बारा लोरिस्क कॉन्टॅक्टवर लक्ष ठेवून काहींची तपासणी केली जात होती. मात्र, मध्यंतरी शहरातच नव्हे, ग्रामीण भागातही अशा संपर्कांबाबत प्रशासनाने गांभिर्याने पावलेच उचलली नसल्याचे चित्र समोर आले होते. यात जळगाव ग्रामीणमध्येही अनेक उदाहरणे समोर आली होती. स्वत: कुणी तपासणीसाठी आले तरच त्यांची तपासणी होत होती.
केस १
एका कुटुंबातील कर्ता पुरूष बाधित आढळून आला. बाधित आढळून आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट मुलगाच घेऊन मुलानेच त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य वगळता अन्य कुणाच्या बाबतीत आरोग्य यंत्रणेने ना विचारणा केली ना कोणी समोर आले.
केस २
एक कर्मचारी बाधित आढळून आले, मात्र, नियमित त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी झाली नाही. लक्षणे आली तर तपासणी करून घेण्याचे सांगण्यात आले. केवळ कुटुंबियांची तपासणी झाली. ते आठ दिवस बाहेरच असल्याचे सांगण्यात आले.
केस ३
एक तरूण बाधित आढळून आल्यानंतर तो स्वत:च त्याच्या कुटुंबियांना तपासणीसाठी घेऊन आला होता. त्याला तेवढी लक्षणे नव्हती. मात्र, या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला होता.
लक्षणे नसलेले अधिक धोकादायक
ज्यांना कोरोनाची लक्षणे येत नाहीत, असे रुग्ण अत्यंत धोकादायक मानले जात आहे. अनेक जण बाधिताच्या संपर्कात येऊ त्यांना अगदी सौम्य लक्षणे जाणवतात किंवा जाणवतही नाही, अशांना कोरोना झालाय हे समजत नाही, मात्र, ते कोरोनाचा संसर्ग वाढतात त्यामुळे अशी लोक अधिक धोकादायक असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे अत्यंत गरजचे असल्याचे सांगितले जाते.
कोरोनाचे एकूण रुग्ण ५९२२२
बरे झालेले ५६२७९
उपचार सुरू असलेले रुग्ण १५६६
कोरेाना बळी १३७७