जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीतील विविध घोटाळ्यांची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे. त्यातच आता अवसायक कंडारे यांना मुदतपूर्व हटवून केंद्र सरकारने नवीन अवसायक म्हणून सहायक निबंधक चैतन्य नासरे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीच्या आधी सहकार आयुक्त कार्यालयाने राज्यभरातील जिल्हा सहकार विभागांना पत्र पाठवून कोण इच्छुक आहे, अशी विचारणा केली होती. त्याला फक्त नासरे यांनीच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच नासरे यांची या जागेवर वर्णी लागली आहे.
‘बीएचआर’चे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बीएचआरमधील कथित अपहाराच्या प्रकरणात त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंडारे हे सध्या फरार आहेत; त्यामुळे सहकार विभागाने नव्या अवसायकाचा शोध सुरू केला होता. त्यासाठी राज्यातून कोण इच्छुक आहे, याची चाचपणीही करण्यात आली. मात्र ‘बीएचआर’चा इतिहास पाहता कुणीही तयार झाले नाही. सहकार कार्यालयाने आधी सर्व जिल्हा उपनिबंधकांना विचारणा केली. त्यानंतर ऑडिटर वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. मात्र त्यातही कुणी तयार झाले नाही. अखेरीस हिंगणा (जि. नागपूर) येथे कार्यरत असलेले चैतन्य नासरे हे या जागी येण्यास तयार झाले.
नासरे यांनी यापूर्वी दि समता सहकारी बँक लि., नागपूरचे मुख्य अवसायक, नागपूर महिला सहकारी बँक लि.चे मुख्य अवसायक म्हणून काम पाहिले आहे. ते सध्या हिंगणा येथे सहायक निबंधक आणि समता सहकारी बँक लि.चे मुख्य अवसायक आहेत.