जळगाव : जिल्ह्यात सहकारी संस्थांची नोंदणी दिवसेंदिवस वाढत असून अवसायनात जाणाऱ्या संस्थांचीही संख्या वाढत आहे. मात्र अशा संस्थांवर प्रशासक नेमताना मनुष्यबळाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्याच्या १५ तालुक्यांसाठी केवळ सहा सहायक निबंधक आहे. त्यामुळे एकेका सहायक निबंधकाकडे अवसायनात असलेल्या तीन ते चार संस्थांचा पदभार आहे.
‘विना सहकार नही उद्धार’ असे ब्रीदवाक्य असलेल्या सहकार क्षेत्रातील स्थिती जिल्ह्याने चांगलीच अनुभवली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था उदयास आल्या व त्यांचे नावदेखील झाले. मात्र नंतर अनेक संस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील कारभाराचे नावही चांगलेच गाजले.
जिल्ह्यात सहकारी संस्था वाढत जाऊन त्या कधी हजाराच्या पुढे पोहचल्या समजले नाही. जिल्ह्यात ३०१९ सहकारी संस्थांची नोंदणी झाली असून अवसायनात गेलेल्या संस्थांची संख्याही ३९० वर पोहचली. या अवसायनात गेलेल्या संस्थांवर प्रशासक नेमून संस्थांचा कारभार चालविला जातो. मात्र जिल्ह्यात अवसायनात जाणाऱ्या संस्थांची संख्या वाढत असताना सहकार विभागात मनुष्यबळ कमी-कमी होत आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून १५ तालुक्यांचा कारभार सहा सहायक निबंधकांवर सुरू असून अवसायनातील संस्थांचा कारभार सोपवितानाही अडचणी येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सहकार विभागात भरती होत नसताना आता निवृत्त होणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. त्याला या ३१ मार्चपासूनच सुरूवात होत असून मार्च, एप्रिल, मे असे एका पाठोपाठ अधिकारी, कर्मचारी निवृत्त होणार आहे.
या सर्वांचा परिणाम अवसायनात गेलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यावर होत प्रशासकांचे पॅनल गठीत करण्यासही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. एकूणच या सर्वांचा अप्रत्यक्षरित्या का होईना मात्र ठेवीदारांच्या हक्काच्या ठेवी परत मिळण्यावर होत आहे.