लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यभरात गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याबाबत आगामी १४ व १५ डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात वेळ मिळाल्यानंतर प्रश्न उपस्थित करू, अशी भूमिका जिल्हाभरातील आमदारांनी मांडली आहे. याबाबत सेना-राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अधिवेशनात नव्हे तर पुढील अधिवेशनात हा विषय गाजविण्याची त्यांची तयारी असल्याचे काही आमदारांनी सांगितले.
कोरोनामुळे अधिवेशन दोनच दिवस आहे. प्रश्न मांडलेले आहेत. त्याची उत्तरे आहेत. त्यामुळे चर्चा करायला या दोन दिवसात किती वाव मिळेल याबाबत साशंकता आहे. तरी जिल्ह्यातील, राज्यातील ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रश्न मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न राहील. - आमदार किशोर पाटील, भडगाव - पाचोरा
अधिवेशन हे दोन दिवसाचे असल्याने वेळ अगदी कमी आहे. चर्चेला वेळ मिळणे कठीण आहे. त्यामुळे येथे वेळेचा प्रश्न राहणार आहे. - आमदार शिरीष चौधरी, रावेर- यावल
पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिवेशनात चर्चा करू. ९० टक्के पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले असून पतसंस्थाची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही आवाज उठवू - आमदार चिमणराव पाटील, एरंडोल- पारोळा
अधिवेशन हे दोनच दिवसांचे आहे. त्यामुळे जे प्रश्न टाकण्यात आलेले आहेत. त्यांच्या चर्चेसाठीही वेळ मिळणे कठीण आहे. तरी संधी मिळाल्यास हा प्रश्न अधिवेशनात मांडू - आमदार संजय सावकारे, भुसावळ
ठेवीदारांचा कष्टाचा पैसा अडकला आहे. राज्यातील सर्व ठेवीदारांना न्याय मिळावा हीच भूमिका आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. - आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव
कोरोनामुळे अधिवेशन दोन दिवसच आहे. त्यामुळे चर्चांना कितपत संधी मिळेल हे निश्चित नाही. दुसऱ्या दिवशी सप्लिमेंटरी मागण्या मंजूर होतील, त्यावेळी संधी मिळाल्यास नक्कीच हा विषय मांडू. - आमदार लता सोनवणे, चोपडा
यंदाच्या अधिवेशनातील प्रश्न निश्चित झाले असून लक्षवेधीमध्ये मुद्दा आल्यास मांडू. मात्र, गेल्या वेळी हा विषय अधिवेशनात मांडण्यात आल्यानंतर केंद्र सरकारकडे असल्याचे सांगण्यात आले होते.
- आमदार सुरेश भोळे, जळगाव शहर
या अधिवेशनात वेळ कमी आहे. मात्र, संधी मिळाल्यास हा विषय मांडलाच जाईल. या अधिवेशनात नाही तर पुढील अधिवेशनात बीएचआरचा हा घोटाळा नक्कीच गाजेल. मी त्यासंदर्भात माहिती संकलीत करीत असून ठेवींदारांना जे वेठीस धरले जात आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा विषय मांडणार आहोत. - आमदार अनिल भाईदास पाटील, अमळनेर