जळगाव : तिकीट आरक्षित नसतानांही प्रवाशांना गाडीत प्रवेश देण्यात असल्यामुळे, आरक्षित डब्ब्यांमध्येच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत भुसावळ रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील सर्व तिकीट निरीक्षकांना ज्या प्रवाशांचे तिकीट आरक्षित आहे, अशा प्रवाशानांच गाडीत प्रवेश देण्याच्या सूचना केल्या आहेत.
सध्या कोरोना काळात ज्या रेल्वे गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांमध्ये फक्त तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशानांच प्रवेश देण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाने केल्या आहेत. मात्र, ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांच्या आरक्षित डब्यांमध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या विनाआरक्षित प्रवासींदेखील प्रवास करताना दिसून आले होते. विशेष म्हणजे या डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसून, सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला दिसून आला होता.
हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर भुसावळ रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे जर तिकीट आरक्षित असेल तरच स्टेशनमध्ये सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. या मुळे आता कोरोना काळापुरता आरक्षित केलेल्या या जनरल डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी ओसरलेली दिसून येत आहे.