जळगाव : जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याविषयी तसेच अन्न सुरक्षेसंदर्भात ज्या विभागावर मोठी जबाबदारी आहे, अशा अन्न व औषध प्रशासन विभागातच मनुष्यबळ अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे. ४३ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यासाठी केवळ एक औषध व एक अन्न निरीक्षक असे दोनच निरीक्षक असून सहा पदे रिक्त आहेत. सहाय्यक आयुक्त (अन्न) हे एकच पद भरलेले असून सहाय्यक आयुक्त (औषध) हे पदही रिक्त आहे.
भौगोलिक व तालुक्यांच्या संख्येनुसारही जळगाव जिल्हा मोठा आहे. साधारण २०० कि.मी. जिल्ह्याची लांबी आहे. जवळपास ४३ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची मोठी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. मात्र, या विभागात ना पुरेसे मनुष्यबळ आहे ना पुरेशी साधनसामग्री आहे. परिणामी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण येण्यासाठी मोठ्या जिल्ह्यात वेळेवर कोठे पोहोचता येत नाही व तपासणीतही मोठ्या अडचणी येतात.
एक तपापासून स्वत:चे वाहन नाही
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असलेल्या स्वत:च्या वाहनाची नोंदणीची मुदत २००८ मध्ये संपली व तेव्हापासून या विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर चाळीसगाव तालुक्यात जायचे झाल्यास ते अंतर १२० कि.मी. आहे. तेथे काही कारवाई करायची असल्यास एसटी बसने अधिकारी, कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच सर्व जिकडे-तिकडे होऊन जाते. अशाच प्रकारे जिल्ह्याला मध्यप्रदेशचीही सीमा लागून असून गुटख्याविरुद्ध कारवाई करायची झाल्यास या सीमेपर्यंतही पोहोचण्यास विलंब होतो.
तपासणीवर परिणाम
जिल्ह्यात २७०० मेडिकल दुकान असून त्यांच्या तपासणीसाठी केवळ एक औषध निरीक्षक आहे. तसे जिल्ह्यासाठी चार पदे मंजूर असून गेल्या कित्येक वर्षांपासून तीन पदे भरलीच जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मेडिकलच्या तपासणीविषयीदेखील अडचणी येतात. विशेष म्हणजे, सहायक आयुक्त (औषध) हे पददेखील रिक्त आहेच.
अन्नसुरक्षा राहणार कशी?
औषध निरीक्षकप्रमाणे अन्न निरीक्षकाचीही तीच स्थिती आहे. जिल्ह्यात १९०० हॉटेल असून इतर चहा, नाश्ता व इतर खाद्यपदार्थ विक्रीची लहान-मोठी हाॅटेल आहेत. त्यांच्या तपासणीसाठीदेखील केवळ एक अन्न निरीक्षक आहे. तसे जिल्ह्यासाठी हेदेखील चार पदे मंजूर असून गेल्या कित्येक वर्षांपासून तीन पदे भरलेच नाही.
न्यायालयाच्या कामकाजासाठी जातो वेळ
जिल्ह्यात ज्या काही कारवाया केल्या असतील त्यातील बरीच प्रकरणे ही न्यायालयात दाखल झालेली असतात. त्यामुळे सध्या कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कामकाजासाठीही वेळ द्यावा लागतो. परिणामी त्याचवेळी काही तपासणी करायची झाल्यास अडचणी येतात.
जिल्ह्याची लोकसंख्या - ४३, ०००००
जिल्ह्यातील मेडिकल्स - २७००
जिल्ह्यातील हॉटेल्स - १९००
औषध निरीक्षक -१
अन्न निरीक्षक - १
——————-
सध्या अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक हे प्रत्येकी एक पद भरलेले आहे. सहायक आयुक्त (औषध) हे पददेखील रिक्त आहे. शिवाय विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. यामुळे अनेक अडचणी येतात.
- वाय. के. बेंडकुळे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन