जळगाव : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे मनुष्यबळ एप्रिल महिन्यापासून कोविडमध्ये नियुक्त करण्यात आल्यानंतर बंद झालेली ओपीडी अद्यापही सुरू झालेली नसून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, ती सुरू करावी की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, समांतररीत्या मोहाडी रुग्णालयात ही ओपीडी सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय हे गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात भाडेतत्त्वावर सुरू होते. या ठिकाणी आयुर्वेदातील विविध औषधोपचार मोफत केले जात होते. यात बाहेर ज्या बाबींना मोठा खर्च येत होता, अगदी शुल्लक रकमेत ते उपचार या ठिकाणी केले जात होते. त्यामुळे सामान्य तसेच गरीब जनतेसाठी ते अत्यंत उपयोगी होती. दुसऱ्या लाटेत मोहाडी रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर मनुष्यबळाचा मुद्दा समोर आला होता. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे १४ डॉक्टर्स या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. एप्रिल महिन्यापासून ही यंत्रणा सुरू होती.
इकडे कॉलेज, तिकडे ओपीडी
आयुर्वेद महाविद्यालय हे सध्या देवकर रुग्णालयाच्या आवारातच सुरू आहे. यात आता नियमित क्लासेस व प्रॅक्टिकल सुरू करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी ओपीडी सुरू नसून अन्य यंत्रणाही मोहाडी रुग्णालयात कार्यरत आहे. मात्र, आता कोविड कमी झाला आहे. शिवाय मोहाडी रुग्णालयात रुग्ण नसल्याने ओपीडी सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र, नॉनकोविडला अद्याप प्रशासनाची या ठिकाणी मान्यता नसून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले.