जळगाव: अभियांत्रिकीच्या क्षेत्रात प्रत्येकजण बीई करून एमबीएच्या मागे धावत आहे. मात्र हे केवळ स्वत:ची उर्जा वाया घालविणे आहे. त्यापेक्षा तांत्रिक शिक्षणच हवे असेल तर डिप्लोमा किंवा आयटीआय करून दोन वर्ष कामाचा अनुभव घ्यावा आणि स्वत:चा कारखाना काढावा, आयुष्य यशस्वी होईल, असे मत पुणे येथील प्रेरणादायी मार्गदर्शक व ‘कल्पकतेचे दिवस’ या पुस्तकाचे लेखक श्रीरंग गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगावात आलेल्या गोखले यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांचे करिअर, शिक्षणपद्धती, उद्योजकता आदी मुद्यांवर मनमोकळेपणे माहिती दिली. त्यांच्याशी झालेला संवाद पुढील प्रमाणे.प्रश्न: युवकांचा त्यातही महाराष्टÑीयन युवकांचा कल उद्योगाकडे कमी आहे. त्याबद्दल काय सांगाल?गोखले: यासाठी शिक्षण पद्धती कारणीभूत आहे. घोकंपट्टी, मार्क्स ओरियंटेड शिक्षणपद्धतीमुळे शिक्षणाचे रूपांतर विद्यार्थ्यांना व्यवहारात करता येत नाही. महाराष्टÑीयन लोकांची मानसिकता अजूनही उद्योगाला अनुकूल झालेली नाही. त्यातच स्पर्धा परिक्षांचे वातावरण निर्माण झाल्यानेही उद्योगाकडे कमी लोक वळतात. सुखासीनतेकडे कल आहे. हे चुकीचे आहे.प्रश्न: उद्योगाचे बाळकडू मिळत नाही, त्याचा हा परिणाम आहे का?गोखले: स्वयंरोजगार असलेले लोक आपल्याकडे आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील अगदीच कमी शिक्षीत सांगायच तर दूध विक्रेता हे स्वयंरोजगार असलेले लोक आहेत. मात्र रोजगार निर्माण करणारा उद्योग करायला कोणी लवकर धजावत नाहीत. कारण स्वत: हात काळे करण्याची तयारी नाही. धोका पत्करण्याची तयारी नाही. पास झालो की, शिपायाची खाली बसायला स्टुल आणि डोक्यावर पंखा असलेली नोकरी मिळाली तरी संतुष्ट! अशी मनोवृत्ती आहे. त्यात आता हळूहळू बदल होत आहे. ‘स्टार्टअप’साठी चांगले वातावरण तयार होत आहे. उपक्रमावर आधारित ( प्रोजेक्ट ओरियंटेड) शिक्षण लोकप्रिय झाले तर अधिक मोठ्या संख्येने उद्योजक तयार होतील. त्यासाठी आपण केवळ ब्रिटीश अथवा अमेरिकन शिक्षणपद्धतीच्याच किंवा परंपरागत शिक्षणपद्धतीच्याच मागे न धावता जर्मनी, जपान, तसेच इतरही अनेक देशांच्या शिक्षणपद्धतींशी तुलना केली पाहिजे.प्रश्न: अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात ‘सॅच्युरेशन’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबद्दल काय सांगाल?गोखले: निश्चितपणे ‘सॅच्युरेशन आहे. मात्र कोणीच काही करत नाही. अॅक्शन होताना दिसत नाही. दहावी पास व्हावे, तसेच विद्यार्थी बीई उत्तीर्ण होत आहेत. नोकरीच करायची तर डिप्लोमा झालेले चांगले. बीई होऊनही संधी मिळत नाहीत म्हणून एमबीए करतात. यात केवळ उर्जा वाया जाते. एमबीएचा काही उपयोग नाही. पुस्तक वाचून पोहोणे शिकण्याचा हा प्रकार आहे. अनुभव नाही, माहिती नाही ते एमबीए होतात. त्यामुळे मॅनेजमेंट या शब्दाची उद्योजकांना भितीच बसली आहे. त्यामुळे आवडत्या विषयात लवकरात लवकर कामाला लागा. नंतर डिग्री मिळवत बसा. माझ्या माहितीतले सगळे डिप्लोमा धारक यशस्वी झाले आहेत.प्रश्न: उद्योजक वाढावेत, यासाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत का?गोखले: अभिांत्रिकीपेक्षाही व्होकेशनल कोर्सेस जास्त सुरू व्हायला हवेत. कारण इंजिनियर झालेल्या युवकांना पुस्तकी ज्ञान आहे. मात्र व्यावहारिक ज्ञान नाही. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे. सध्या शासनाने सुरू केलेला डेकॅथॉन हा शिक्षण विभागाचा उपक्रम चांगला आहे. यात उद्योगांना आलेल्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर देण्यात येत आहे. त्यातून मुलांच्या कल्पकतेला चालना मिळणार आहे.