नशिराबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील निर्बंध हटविले आहे. त्याच प्रकारे भक्तांचे श्रद्धास्थान असलेले सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा युवा गुरव मंडळ व अखिल गुरव समाज संघटना यांच्यातर्फे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक निर्बंध हटविण्यात आले असून मंदिरे अजूनही बंद आहे. मंदिरे बंद असल्यामुळे ज्यांची उपजीविका मंदिरावरच आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुजाऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पुजाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश करावा, त्यांचे लसीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
उप जिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना या विषयी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी युवा गुरव मंडळाचे अध्यक्ष मुकेश ओगले, सचिव योगेश गुरव, भूषण उधळीकर, सचिन शेटे, जेष्ठ सल्लागार चंद्रकांत सुरवाडे, जयंत गुरव, जगदीश गुरव उपस्थित होते.