लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असतो. चिरंजीव होतो श्रीयुत, अन् कुमारी सौभाग्यवती होते. पुरुषाला स्त्रीमुळे आणि स्त्रीलासुद्धा पुरुषामुळे पूर्णत्व प्रदान करणारा हा सुंदर सोहळा विवाहसुलभ स्वप्नांना पूर्णविराम देतो. अनुरुप जोडीदार मिळाला तर आनंद निर्मिणारी अन् विजोड जोडणी झाली तर विफलता देणारी ही घटना पार पडेर्पयत ब:याच गोष्टी अनावृत्त ठेवणारी पण काही आवृत्त गोष्टींवर पुढचं पाऊल अवलंबून असतं. निभलं तर चांगलं! एकतर काही अहवालांनी मुलींची संख्या मुलांच्या संख्येत कमी आहे हे सिद्ध केल्याने काही मुले अविवाहित राहणार हे निश्चित आहे. मग आंतरजातीय विवाह झाले तरी हे दुर्दैव पाठपुरावा करणार. मुलांची संख्या जास्त असूनही उपवर मुलींचे पालक लगीनघाईत तर मुली कमी असल्याने नोकरी नसलेल्या लग्नाळू, वाढत्या वयाच्या मुलांचे पालक धास्तावलेत लग्नाच्या प्रश्नाने. स्थळांची शोधाशोध, दोन्ही पक्षांच्या पालकांची दमछाक करतेय. मग लगीनमास्तर नावाच्या माध्यमाचाही धांडोळा सुरू होतो. लगीनमास्तर ही हुशार असामी बहुधा निवृत्त असते. त्यातही तो शिक्षक असतो. वधू-वर सूचक मंडळाची मोबाइल आवृत्ती म्हणजे लगीनमास्तर. वर आणि वधूपक्षाला सहाय्यभूत होत, त्यांना अलगद जोडणारी ही नि:स्वार्थी जमात. बिनभांडवली पुण्यकर्म करणारी. लग्ने ही स्वर्गात ठरतात, हे म्हणणं खोटं ठरवणारी. ती पृथ्वीवर ही लगीनमास्तर मंडळीच तर जमवतात, ठरवतात. यांच्याकडे अलिकडच्या काळात बोकाळलेली हमाली-दलाली-कमिशन पद्धती नसते. उलटपक्षी परोपकाराची प्रवृत्ती तेवढी जागी असते. खरं तर लगीनमास्तर स्थळं सुचवण्याचे कार्य करतात. नंतरच विवाहपूर्व बारीकसारीक चौकशीचे काम पालकांचेच. पण आपली वैगुण्ये, उणीवा, दोष, वाईटसाईट सवयी, व्यसनं पालकांपासून दडवलीच जातात. मुला-मुलींकडून मग ती लगीनमास्तरांना कशी ठाऊक असणार? पण नेमकं त्यांनाच जबाबदार धरलं जातं. ही काळी बाजू लग्नानंतर पुढे आली की वाईटच सारं ! एका विवाहात खूप जबर किंमत मोजावी लागली होती मास्तरांना. एकदा रोग रेडय़ाला अन् डाव पखालीला अशी गत झाली होती. लग्नानंतर एका महिन्यात एका वधूने स्वत:ला जाळून घेतले. अंदर की बात मुलीच्या कुणालाही कळली नाही. पोलीस केस झाली. सासू-सासरा-नवरा यांच्यासह वडिलांनी मास्तरांनाही गोवले. मास्तराना धर्म करा अन् चावडी चढा असं झालं. आत जावंच लागलं बिचा:यांना. जामीन झाला पण बट्टा तर लागला मास्तरांना. वधू-वर सूचक मंडळातून निवडलेल्या सुनेने सहा महिन्यात पतीचा बैल करीत सासू-सास:यांना बेघर केल्याच्या घटनेने पालकांना पश्चाताप झाला. लगीनमास्तरांना सांगायाला हवं होतं म्हणत पालकांनी मूग गिळलेत. काही प्रसंगात उन्स लगीनमास्तरांचं होरपळणं, नक्कीच पालकांच्या चिंतांचं ओझं खांद्यावर घेण्यापरीस वाईटच. माङया पहाण्यातल्या एका सुस्वरूप, सुशिक्षित नवरीला श्रीमंत सासर सोडून चार महिन्यातच माहेरी यावे लागले होते. पोर सुन्न. काही बोलेना मायबापाशीही. मुलाचे व मुलीचे स्थळही लगिनमास्तरांना सुपरिचित होते तेही चक्रावले काय ते कळेना! काही दिवसांनी कळले, मुलगा माणसात नव्हता. ही माहिती जर माहीत असूनही आई-वडिलांनी दडवली तर लगीनमास्तरांना कशी ठाऊक असणार. आजही पोरी मायबाप मास्तरांशी अबोला धरून आहेत. सहज वाटून गेलं. मास्तर, शिक्षणाइतकं जग सोपं नाही. हो.. शिक्षणातला सगळा अंदाज तुम्ही घेऊ शकता. या जगाचा थांग नाही. पण धन्य तुमची मास्तर! चावडी चढूनही तुम्ही उपकार करणं नाही सोडलं ! लगीनमास्तरांचे विश्व पातळ.. विरळ झालं तरी चालेल पण नापीक होऊ नये एवढंच! गरज आहे समाजाला तुमची अजून तरी.. गैरसमजाचं तण येतच राहील अधूनमधून, तुम्ही कार्यरत रहा !!
लगीनमास्तर, कार्यरत रहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:49 AM