भुसावळ : महाजेनकोच्या दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील सहा-सात महिन्यांपासून बंद असलेला संच क्रमांक तीन अखेर बुधवारी कार्यान्वित करण्यात आला. त्यातून सुरुवातीला १३२ मेगावॅट विजेची निर्मिती सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. दरम्यान, वीजनिर्मिती सुरू होताच हा संच राज्यातील ग्रीडशी जोडण्यात आल्याचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी सांगितले.दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन गेल्या काही महिन्यांपासून बंद होता. हा संच कार्यान्वित करून वीजनिर्मिती करण्याची सूचना मंगळवारी दीपनगर प्रशासनाला देण्यात आली होती. सूचना मिळताच संच सुरू करण्याचे तांत्रिक सोपस्कार सुरू करण्यात आले ते पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळी १०.१६ वाजता संच क्रमांक तीन कार्यान्वित करण्यात आला. या संचातून सायंकाळी ५.२० वाजता १३२ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती सुरू झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील विजेच्या मागणीत सतत वाढ होत आहे. संच क्रमांक तीन हा आरएसडी स्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून होता तो आता सुरू करण्यात आला. दीपनगरातून विक्रमी वीजनिर्मितीदरम्यान, दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅटचे दोन व २१० मेगावॅट क्षमतेचा एक अशा तीन संचांमधून वीजनिर्मिती सुरू आहे. संच क्रमांक तीन-१३२, संच क्रमांक चार- ४७७, संच क्रमांक पाच- ४७८ अशी एकूण १०७८ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.दीपनगर वीजनिर्मिती केंद्रात पाणी व कोळसा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे आता बंद असलेला संच क्रमांक दोनही सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. कंत्राटी कामगारांनीदेखील तशी मागणी केली आहे. हा संच सुरू झाल्यास अस्थाई कामगारांच्या हाताला काम मिळेल, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)बुधवारी राज्याची विजेची मागणी तब्बल १९ हजार ९०४ मेगावॅट इतकी असल्याची माहिती दीपनगरातील सूत्रांकडून देण्यात आली.महानिर्मितीची वीजनिर्मिती ७ हजार ८६१ इतकी वीजनिर्मिती होती. यात खाजगी उद्योगांची ३ हजार ३१८ आणि केंद्राची (एनटीपीसी) ६ हजार ९६२ मेगावॅट व पवन ऊर्जा-७९० अशी वीज वापरुन महाराष्ट्राची विजेची मागणी पूर्ण केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीपनगरातील संच क्रमांक तीन कार्यान्वित
By admin | Published: February 16, 2017 12:36 AM