जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचे काम पुन्हा वॉटरग्रेस कंपनीला देण्याबाबत महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांचा विरोध झुगारत याच कंपनीला शहरात पुन्हा सफाईच्या कामाचा मक्ता देण्याचा निर्णय मंगळवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या दालनात सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.भाजपच्या पदाधिकाºयांनी वॉटरग्रेसला एक संधी देण्याचा निर्णय घेतला. तर शिवसेना व एमआयएमच्या पदाधिकाºयांनी मनपाचा हिताचा निर्णय घेवून, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांवरच सोपविली आहे. तर महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवित, वॉटरग्रेसला संधी न देण्यावर ठाम राहिले.फेब्रुवारी महिन्यात वॉटरग्रेसचे काम थांबविल्यानंतर वॉटरग्रेस कंपनीने या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे भविष्यात याविषयी मनपा प्रशासन अडचणीत येवू शकते. त्यामुळे काही नवीन नियमांसह वॉटरग्रेस कंपनीला नवीन संधी देण्याबाबतचा प्रस्तावाबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी आपल्या दालनात सर्वपक्षीय पदाधिकारी, गटनेते व प्रमुख नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना गटनेते अनंत जोशी, भाजप गटनेते भगत बालाणी, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे, विधी सल्लागार अॅड.आनंद मुजूमदार आदी उपस्थित होते.आयुक्तांच्या प्रस्तावावर भाजपकडून गटनेते भगत बालाणी यांनी पक्षाची भूमिका मांडली. वॉटरग्रेसला पुन्हा संधी देण्यात यावी याबाबत सांगितले. महापौर पती व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी ही भूमिका पक्षाची असल्याचे सांगत माझा व महापौरांचा या कंपनीला पुन्हा संधी देण्याबाबत विरोध असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. पक्षाच्या निर्णयापुढे आम्ही जावू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वॉटरग्रेसच्या बोगस कामाबाबत आवाज उठविला होता. त्यामुळे गुन्हे देखील आमच्यावर झाले आहेत. त्यामुळे त्या कंपनीला पुन्हा संधी देण्यास विरोध राहणार असल्याचे कैलास सोनवणेंनी सांगितले. मात्र, आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी याबाबत मनपाच्या हिताचा निर्णय घ्यावा त्यांच्या निर्णयाला आपला पाठींबा राहणार असल्याचेही सोनवणे म्हणाले.शिवसेना, एमआयएमने आयुक्तांवर सोपविला निर्णय- भाजपने वॉटरग्रेस कंपनीला संधी देण्यावर निर्णय घेतला. तर शिवसेना व एमआयएमच्या पदाधिकाºयांनी याबाबत आयुक्तांनीच निर्णय घेण्याची भूमिका घेतली. मनपाचे हीत पाहून आयुक्तांनी याबाबत निर्णय घ्यावा असे मनप विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सांगितले. तर एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांनीही आयुक्तांवरच हा निर्णय सोपविला.-वॉटरग्रेसला पुन्हा संधी देताना नव्याने नियमावली तयार करून घ्यावी, सफाईच्या कामात ढिसाळपणा झाल्यास पुन्हा संधी मिळणार नाही याबाबतचा उल्लेख करून घ्यावा असेही मुद्दे नगरसेवकांनी उपस्थित केले. तब्बल दोन तास वॉटरग्रेसला संधी देण्याबाबत विचारमंथन झाले. अनेकांनी दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून पुढील महासभेपुढे ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.महापौर हतबल का ? - अनंत जोशीभाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी याबैठकीत आहेत. महापौर हे मोठे पद आहे. कैलास सोनवणे हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. सर्व निर्णयक पदाधिकारी या बैठकीत असताना एकच निर्णय घ्यायला काय अडचण आहे ? असा सवाल शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी उपस्थित केला. तसेच महापौर हतबल का आहेत ? असाही प्रश्न उपस्थित केला. सर्व निर्णायक पदाधिकारी बैठकीत उपस्थित आहेत. अशावेळी पक्षाचा पाठींबा अन् महापौरांचा विरोध असे चित्र का दिसत आहे ?, या बैठकीत उपस्थित नसलेल्यांना जास्त अधिकार आहेत का ? असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला.कायदेशीर अडचणी येवू नयेत म्हणून घ्यावा निर्णयया बैठकीत उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी हा मक्ता रद्द केला तर काही प्रमाणात मनपासमोर कायदेशिर अडचणी उभ्या राहू शकतात असे सांगितले. त्यामुळे नियमांच्या अधिन राहून व करारात काही प्रमाणात बदल करून वॉटरग्रेसला शेवटची संधी दिली जावी याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी बैठकीत ठेवला. यावर विधीतज्ज्ञांकडून ठेका रद्द केला तर येणाºया अडचणी व पुन्हा संधी दिली तर काय परिणाम होईल याबाबतची समीक्षा आयुक्तांनी केली.
महापौरांचा विरोध झुगारत वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:15 AM