लोकमत न्यूज नेटवर्क
शिरसोली : शिरसोली प्र. न. आणि प्र. बो. या दोन्ही गावांमध्ये बोटांवर मोजण्याइतके प्रस्थापित वगळले तर बहुतांश नवीन उमेदवार निवडणूक लढत असून, प्र. न. मध्ये ५४ तर प्र. बो. मध्ये ५५ उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही गावांमध्ये प्रत्येक वॉर्डात तिरंगी लढती होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.
शिरसोली प्र. न. मध्ये पॅनल सोडून २० अपक्षांनी नशीब अजमावले आहे. यात वॉर्ड १ मध्ये दोन जागा असून, यात दोन दोन उमेदवार समोरासमोर आहेत. या ठिकाणी ४ अपक्षांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. या निवडणुकीत तरुणांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. सोमवारी दोन्ही गावांतील सुमारे तीस जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे.
माजी सरपंचांची वेगळी आघाडी
शिरसोली प्र. बो. मध्ये एका माजी सरपंचांनी दोन्ही पॅनल सोडून स्वत:च्या तीन उमेदवारांची एक वेगळी आघाडी उभी केली असून, वॉर्ड तीनमध्ये एक वेगळेच गणित समोर आले आहे. यात वॉर्ड एकमध्ये दोन जागा असून, या ठिकाणी चार उमेदवार तर चार अपक्षांनी अर्ज कायम ठेवले. गावात ६ वॉर्ड असून एकत्रित १२ अपक्षांनी अर्ज कायम ठेवले आहेत. माघारीच्या दिवशी अनेकांनी माघार न घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.