जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा येत्या १० जूनपासून सुरू होत आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना कोविडमुळे या परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० जूनपासून घेण्यात येत आहेत. परंतु, कोरोनाचा संसर्ग कायम असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या बाधेमुळे परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अभाविपने स्वागत केले आहे. तर या विशेष परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केली आहे.