महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे. कृषिपंप ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी , माफी व बिल भरण्याबाबतची माहिती महावितरणच्या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.
- जळगाव जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ६५७ कृषिपंप ग्राहकांकडे सद्यस्थितीला ३३४१ कोटी ३० लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण ११५१ कोटी २८ लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या २१९० कोटी २ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के, १०९५ कोटी १ लाख इतकी रक्कम माफ करण्यात येणार आहे.
- धुळे जिल्ह्यात ९९ हजार ४७२ कृषिपंप ग्राहकांकडे सद्यस्थितीत १३२० कोटी ६७ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील व्याज व विलंब आकाराचे एकूण ४८२ कोटी ४२ लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या ८३८ कोटी २५ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ४१९ कोटी १२ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे.
- नंदूरबार जिल्ह्यातील ५५ हजार ५०७ कृषिपंप ग्राहकांकडे सद्यस्थितीत ७४५ कोटी ३१ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण २५८ कोटी ८० लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या ४८६ कोटी ५१ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २४३ कोटी २५ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे.
इन्फो :
शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्तीची संधी तसेच वसूल झालेल्या बिलातील ६६ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे. महावितरणतर्फे जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांशी थेट संवाद साधून या अभियानाची माहिती दिली जात आहे. तसेच वीजबिलांबाबत तक्रारी असल्यास तात्काळ सोडविण्याच्या सुचना केल्या आहेत.
-दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण.