जळगाव,दि.9- भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांनी शहरातील दारू दुकाने, बियरबारसाठी महामार्ग, राज्यमार्गाचा अडसर नको म्हणून हे मार्ग महापालिकेच्या हद्दीत यावेत, अशी विनंती करणारे पत्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे, पण दुस:या बाजूला भाजपाच्या महापालिकेतील नगरसेवकांनी शहरात भरवस्तीत दारू दुकाने, बियरबार नको, अशी भूमिका मांडली आहे. भरवस्तीत बियरबार आले तर त्याचा रहिवाशी, विद्यार्थी यांना अधिक त्रास होईल, समस्याच वाढतील, असे या नगरसेवकांनी म्हटले आहे.
जे बियरबार, दारू दुकाने महामार्ग किंवा राज्यमार्गानजीक 500 मीटर अंतरात असतील ते बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही बाब लक्षात घेता राज्यमार्ग, महामार्ग हे पालिकांच्या हद्दीत आणून बियरबार, दारू दुकाने वाचविण्याची खटपट अनेक राजकीय व्यक्ती, दारू विक्रेते करीत आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी तर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेले सहा रस्ते हे पालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी करून दारू दुकाने सुरू राहावीत, असा अप्रत्यक्ष प्रयत्नच केला आहे. याच वेळी भाजपाच्या नगरसेवकांनी मात्र भरवस्तीत दारू दुकाने असायलाच नको, अशी भूमिका मांडली आहे. रहिवासी भागातील व भरवस्तीतील दारू दुकानांना भाजपा नगरसेवक रवींद्र पाटील, जयश्री नितीन पाटील व उज्ज्वला किरण बेंडाळे यांनी विरोध दर्शविला आहे.