जळगाव - उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार योजनेचा लाभ डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे शंभर टक्के बँक खाते काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या या आदेशाचा राष्ट्रवारी शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे.
जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन बँक खाते काढण्याचा आदेश रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, याआधी विविध लाभाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यावेळी ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँक नसणे, शून्य रकमेवर खाते काढण्यास बँकांची टाळाटाळ, वर्षभर व्यवहार न झाल्यामुळे बँक खाते पडणे यासह इतर कारणांमुळे शिक्षकांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. आता मिळणारा लाभ हा केवळ उन्हाळी सुट्टीतील असून तो खात्यात जमा होणार आहे. त्या अत्यल्प रकमेसाठी खाती काढण्यास पालकांना प्रवृत्त करणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीतील पोषण आहार पूर्वीप्रमाणे शाळास्तरावरून वाटप करावा किंवा रक्कम विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यांवर वर्ग करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना राजेंद्र ठाकरे, सुनील परदेशी, भगतसिंग पाटील, विजय देवरे, धनसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती.