जळगाव: वार्षिक विकास योजना तसेच महानगरपालिका फंडातून नगरसेवकांना निधीचे वितरण केले जात असल्याचे सांगितले जात आहे. नगरसेवकांची आता मुदत संपत आहे. त्यामुळे या निधीचा वापर विकास कामांसाठी कमी होईल. गैरव्यवहार करुन तो पैसा निवडणुकीत वापर जाईल असा संशय करुन या निधीच्या वितरणास विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. निधीचे वितरण झाले तर उच्च न्यायालयात जाऊ असा इशारा ॲड.विजय दाणेज यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या निधीच्या संदर्भात सोमवारी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पद्मालय शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. लोकशक्ती प्रतिष्ठानचे पराग कोचुरे, आम आदमी पार्टीच्या अमृता नेतकर, भीम आर्मीचे चंद्रमनी मोरे यांच्यासह १६ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निधीच्या संदर्भात सीसीसी कलम ८० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना नोटीस देण्यात आली आहे.
तरी देखील निविदा प्रकाशित करुन नगरसेवकांना कामे दिली तर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली जाईल. निवडणूक होईपर्यंत निधीच मंजूर करु नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर लोकशक्ती प्रतिष्ठान, हिंदू मुस्लीम एकता फांऊडेशन, तांबापुरा फांऊडेशन, काद्री फाऊंडेशन, साहिल फांऊडेशन, सिराज मुलतानी फांऊडेशन, भीम आर्मी, आम आदमी पार्टी, भारत मुक्ती मार्चा, बहुजन मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती व छत्रपती क्रांती आदी संघटनांच्या प्रतिनिधींच्या सह्या आहेत.