जळगाव - गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मनपाची स्थायी समितीची सभा ऑनलाईन घेण्याचा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असून, नियमांचे पालन करून व मनपाच्या स्थायी समिती व विविध वैधानिक सभा या सभागृहात घेण्याचे आदेश राज्य शासनाने मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मनपातील आगामी स्थायी समितीची सभा सभागृहातच घेतली जाणार आहे.
पारा १० अंशावर, गारठा वाढला
जळगाव - शहराच्या किमान तापमानात आता दिवसेंदिवस घट होत असून, सोमवारी शहराचा किमान पारा १० अंशापर्यंत खाली आला होता. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपासून वातावरणात चांगलाच गारठा जाणवत होता. तसेच कमाल तापमान देखील २९ अंशापर्यंत खाली गेल्याने दिवसभर गारठा जाणवत होता. गारठा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोट्या पेटवताना दिसून येत आहे. तसेच रात्री ८ नंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ देखील कमी झालेली पहायला मिळत आहे.
बोचऱ्या थंडीत राजकीय गप्पांनी वातावरण गरम
जळगाव - एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण गरम झालेले पहायला मिळत आहे. ग्रामीण भागात राजकीय चर्चांना उधान आले असून, नेहमी रात्री ८ वाजेनंतर सामसुम होणारी खेड्यांमध्ये आता रात्रभर गप्पांचे फड रंगू लागले आहेत. पॅनल, आघाडी, वार्ड, भाऊबंधकी अशा समीकरणांचा आधार घेवून ग्रामीण राजकारण आता पेटू लागले आहे.
धुराची समस्या वाढली
जळगाव -आव्हाणे शिवारातील मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी पडलेल्या लाखो टन कचऱ्याला आग लागल्याने प्रचंड विषारी धुर परिसरात पसरत आहे. त्यातच थंडीत हवेची घनता कमी असल्याने या धुरामधून दुर्गंधी देखील पसरत आहे. याबाबत परीसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मनपा आरोग्य विभागाकडे चंदु अण्णा नगर, पवार पार्क परिसरातील नागरिकांनी निवेदन सादर केले.