ऑनलाईन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 17 - खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील 18 प्राध्यापकांच्या बेकायदेशीर भरतीप्रकरणात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ना हरकत प्रमाणपत्र रद्द करून ही भरती रद्द करण्याचे आदेश खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्याना दिले आहेत. अमळनेर येथील लोटन महारु चौधरी यांनी प्रताप महाविद्यालयात झालेल्या 18 प्राध्यापकांची भरती बेकायदेशीर असल्याची तक्रार उप संचालकांकडे केली होती. खान्देश शिक्षण मंडळावरील बरखास्त कार्यकारिणीने जानेवारी 2017 मध्ये कोणतीही जाहिरात न देता ही भरती केली होती. शिक्षण उप संचालकांनी शिंदे यांच्या मार्फत मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार करून त्यांना ना हरकत व शिक्षण सेवकांची मान्यता दिली होती आणि याबाबत आमदार चंदूलाल पटेल यांनी जाब विचारला असता शिक्षण उप संचालकांनी कोणतीही मान्यता दिली नसल्याचे सांगून हात झटकले होते. मात्र तक्रारदाराने माहिती घेतली असता गरुड नावाची एक प्राध्यापिका पारोळा महाविद्यालयात असतानाही अमळनेर महाविद्यालयाच्या मस्टरवर मार्चपासून सह्या सुरू झाल्या आणि उर्वरित 18 प्राध्यापकांच्या सह्या वेगळ्या हजेरी पत्रक वर घेतल्या जात आहेत. शिक्षण उपसंचालकांनीही भ्रष्टाचार केल्याचा आरोप चौधरी यांनी लेखी तक्रारीत करून ना हरकत रद्द करावी व मान्यता ही रद्द करीत कठोर कारवाई करावी, अन्यथा पोलिसात जबाबदार सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा चौधरी यांनी दिला होता. याची उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दाखल घेऊन त्यांच्याच कार्यालयाची नाहरकत रद्द करून बेकायदेशीर भरती रद्द करण्याचे आदेश 16 जून रोजी दिले असून यामुळे अमळनेरसह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे
खान्देश शिक्षण मंडळातील भरती रद्द करण्याचे आदेश
By admin | Published: June 17, 2017 3:40 PM