लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आठ ग्रामसेवकांनी निलंबन आणि बदलीनंतरदेखील शासकीय दप्तर जमा न केल्याने त्यांच्यावर दिवाणी कारावासात पाठविण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी सायंकाळी दिले. यातील पाच ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याच दालनातूनच थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. तर एका ग्रामसेवकाला आजारी असल्याने दप्तर जमा करण्यास चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर उरलेले दोन ग्रामसेवक हे कर्तव्यावर हजर नसल्याने त्यांना दिसतील तेथे ताब्यात घेण्याचे आदेशही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येकी ५० हजाराचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
राहुल नारायण पाटील, चिंचखेड सिम ता. बोदवड, सुभाष रामलाल कुंभरे, धोंडखेडा ता. बोदवड, सुरेश दत्तात्रय राजहंस वरखेड खु. ता. बोदवड, गणेश रामसिंग चव्हाण, जुनोने दिगर ता. बोदवड, राहुल नारायण पाटील आमदगाव ता. बोदवड, नंदलाल किसन येशीराया लोणजे ता. बोदवड अशी दिवाणी बंदिवासात पाठवण्यात आलेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. यातील राहुल पाटील आणि गणेश चव्हाण यांना निलंबित करण्यात आले होते. तर इतरांची बदली करण्यात आली होती. तर डी.एस. इंगळे वडजी ता. बोदवड हे आजारी असल्याने त्यांना दप्तर जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तर विनायक चुडामण पाटील झुरखेडा ता. धरणगाव, अनिल कचरू जावळे, दोनगाव ता. धरणगाव हे दोन्ही ग्रामसेवक कर्तव्यावर हजर नसल्याने त्यांना दिसतील तेथे ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
एकाकडे दोन पदभार
या प्रकरणात एकूण ९ ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र राहुल पाटील यांच्याकडे दोन गावांचा पदभार आहे. त्यांची नियुक्ती चिंचखेड सिम येथे आहे, तर त्यांच्याकडे आमदगावचाही पदभार देण्यात आला आहे.