लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेली जिल्हा सीमा बंदी ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. या सोबतच उद्योग, कारखानेही ३० पर्यंत बंदसह इंधन विक्रीच्या वेळीचेही बंधन, संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमावरही बंदी राहणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिन्यापासून जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी विविध आदेश जारी केले. यामध्ये नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करीत पाच पेक्षा अधिक व्यंतींना एकत्र येण्यास बंदी घातली. १५ एप्रिलपर्यंत असणारी ही संचारबंदी आता ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. यासोबतच १४ एप्रिलपर्यंत कारखाने, उद्योग, कंपनी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश डोळे होते, तेदेखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. आजूबाजाच्या जिल्ह्यातील येणारे जाणारे यांची गर्दी होऊन येणारा संपर्क टाळण्यासाठी असलेली सीमाबंदी देखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक उपक्रम, जत्रा, उरूस, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यांच्यावरही ३० एप्रिलपर्यंत बंदी कायम राहणार आहे. या सोबतच पेट्रोल, डिझेल विक्रीच्या वेळांवर असलेले बंधन देखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. असे पाच आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी काढले असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.