जळगाव : भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील ग्राम पंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व हल्ली बदरखे, ता.पाचोरा येथे कार्यरत असलेले भिला काशीनाथ बोरसे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयोगाने त्यांच्या पगारातून १० हजार कपातीचे आदेश दिले आहेत.खेडगाव येथील वसंत काशिनाथ शिनकर यांनी ११ आॅगस्ट २०१६ रोजी ग्रामपंचायतीकडे माहिती अर्ज केला होता. ग्रामसभेच्या ठरावाच्या नकला त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागविल्या होत्या. त्यासाठी त्यांनी रितसर माहिती शुल्क ४२ रुपयेदेखील भरले होते. तरीदेखील ग्रामसेवक भिला बोरसे यांनी शिनकर यांना माहिती पुरवली नव्हती. याउपर त्यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागितली होती. आयोगाने ग्रामसेवक बोरसे यांच्याकडून खुलासा मागविला. ९ आॅगस्ट २०१९ रोजी त्यांनी आयोगाला दिलेल्या लेखी खुलाशात अपिलार्थी शिनकर यांना माहिती पुरविण्याकामी गटविकास अधिकारी, भडगाव यांच्याकडून अनुदान उपलब्ध न झाल्याचे म्हटले होते. यावर समाधानकारक खुलासा आयोगास सादर केला नाही व ग्रामसेवक यांनी हेतुपुरस्सर टाळाटाळ केली म्हणून माहिती अधिनियमातील कलम ७(१) चे उल्लंघन झाल्याने माहिती अधिनियम २००५ चे कलम २०(१) नुसार कारवाई आयोगाने केली.यानुसार १०,००० हजाराची रक्कम ग्रामसेवक भिला बोरसे यांच्या वेतनातून दोन समान हफ्त्यात कपात करुन ती माहितीच्या अधिकार या लेखाशीषार्खाली जमा करण्याचे आदेश नाशिक खंडापीठाचे राज्य माहिती आयुक्त के.एल बिश्नोई यांनी काढले आहेत.