जळगाव : आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सोमवारी सकाळी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर स्वतंत्र पथक गठित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ उदय टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावलचे पी. पी. मोराणकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून विहित वेळेत अहवाल सादर करावेत. माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर स्वतंत्र पथक गठित करण्यात येईल.शासकीय यंत्रणेचा वापर प्रचारासाठी होऊ देऊ नकानिवासी उपजिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणेचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर होणार नाही याची प्रत्येक विभागप्रमुखाने दक्षता घ्यावी. शासन किंवा सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करू नयेत. कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, आदींचा वापर त्याच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटिशी चिटकवणे किंवा घोषणा आदी लिहिण्यासाठी वापर करता येणार नाही. यामध्ये खासगी व सार्वजनिक जागांचा समावेश असेल, असेही त्यांनी नमूद केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी हुलवळे यांनी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची व तयारीची सविस्तर माहिती दिली.निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाºयांना तत्काळ कार्यमुक्त करालोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही ‘सी-व्हीजील’ या मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर १०० मिनिटांत कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्त कर्मचाºयांना संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या प्रचार कार्यालयास परवानगी देताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उत्पादन शुल्क विभागाने गस्त वाढवावी. जेणेकरुन अवैध दारु विक्री होणार नाही. परिवहन विभागाने प्रचाराच्या वाहनास परवानगी घेतली आहे याची खात्री करावी. मतदान केंद्र व केंद्राचा परिसर स्वच्छ व सर्व सुविधांनी युक्त राहील याची दक्षता घ्यावी.जिल्ह्यात कुठेही शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण आढळल्यास संबंधितांस जबाबदार धरण्यात येईल. त्याचबरोबर ही निवडणूक प्लॅस्टीकमुक्त करावयाची असल्याने सर्व संबंधितांनी याची काळजी घेऊन या मोहिमेस सहकार्य करावे.
आचारसंहिता भंग केल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:34 PM