ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - वॉर्ड क्रमांक 12 मध्ये दादावाडी परिसरात काही ठिकाणी कचरा उचलला जात नसल्याचे आढळून आल्याने या ठिकाणच्या सफाई ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश बुधवारी देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व मनपा आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या पथकाने वॉर्ड क्रमांक 28 व 12 मध्ये भेट दिली. वॉर्ड क्रमांक 28 मधील मु.जे. महाविद्यालयामागील भाग, भुषण कॉलनी, शिव कॉलनी, खोटे नगर, पिंप्राळा परिसराला त्यांनी भेट दिली. या भागातील साफसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली. वॉर्ड क्रमांक 12 मध्ये दादावाडी परिसरात काही ठिकाणी कचरा पडून असल्याचे लक्षात आले. या भागातील साफसफाईचे काम मक्तेदारामार्फत केले जात असते. परिसरातील कचरा बघून मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. साफसफाईच्या कामांसाठी दुसरे पथक उपायुक्त चंद्रकांत खोसे व सहा. आयुक्त लक्ष्मीकांत कहार यांचे होते. प्रभाग समिती 3 व प्रभाग समिती चार अंतर्गत येणा:या वॉर्डाना या पथकाने भेट दिली. काही ठिकाणी कचरा आढळून आल्याने व नागरिकांनी तक्रारी केल्याने तेथील साफसफाईच्या कामांना गती देण्याच्या सूचना या अधिका:यांनी केल्या.