जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने तत्कालीन तहसीलदारांनी परस्पर सोडल्याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीविषयी व तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या कामकाजाविषयीचा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले आहे.
जिल्ह्यात अवैध वाळूची वाहतूक वाढल्याने ही वाहने पकडण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष अभियान राबवून अवैध गौण खनिजाच्या वाहनांवर कारवाई केली होती. ही वाहने तत्कालीन तहसीलदारांकडे दिली होती व ती जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात लावलेली होती. तहसीलदाराचा पदभार वैशाली हिंगे यांनी स्वीकारल्यानंतर ही वाहने तेथे आढळली नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली होती.
शासकीय कारवाई न करता हिंगे यांनी ही वाहने परस्पर सोडल्याचाही आरोप गुप्ता यांनी केला होता. यामुळे शासनाच्या करोडो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत असून हे नुकसान करणाऱ्या तत्कालीन तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यावर कारवाई करण्याचा अर्ज गुप्ता यांनी दाखल केला होता. या विषयी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सप्टेंबर २०२०मध्ये प्रांत कार्यालयाला कळविले होते, मात्र बराच कालावधी होऊनही अंतिम अहवाल मिळाले नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वस्तूस्थितीदर्शक तत्काळ अहवाल सादर करावा, असे त्यात म्हटले आहे.
——————-
अवैध गौण खनिजाची जप्त केलेली वाहने सोडल्याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीविषयी चौकशी करण्याचे पत्र मिळाले असून त्याची माहिती घेणे सुरू आहे.
- तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी.