जळगाव: : सुभाष चौक अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेने बेकायदेशीरपणे कर्ज दिले असल्याची तक्रार अजय शांतीलाल ललवाणी यांनी केली आहे. त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिंबधक संतोष बिडवई यांनी जळगाव तालुका निबंधकांना दिले आहेत. ही तक्रार जिल्हा उपनिंबधकांनी तालुका उपनिबंधकांकडे वर्ग केली आहे. या प्रकरणात बँकेचे अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी खुलासा देखील सादर केला आहे.
अजय ललवाणी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘ मेहरुणमधील सर्वे नंबर ४१३ मधील प्लॉट नंबर १५९ या मिळकतीवर २३ कोटी रुपयांचे कर्ज सुभाष चौक अर्बन पतसंस्थेने दिले आहे. या मिळकतीवरील कर्ज एका विकासक आणि बांधकाम कंपनीच्या नावाने श्रीराम गोपालदास खटोड यांनी घेतले आहे. श्रीराम खटोड हे बँकेचे अध्यक्ष श्रीकांत खटोड यांचे भाऊ आहेत. हे कर्ज खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.’
तक्रारीत तथ्य नाही
या प्रकरणात आम्ही खुलासा सादर केला आहे. कोणतीही कागदपत्रे खोटी नाहीत. या तक्रारीत तथ्य अजिबात नाही. - श्रीकांत खटोड