जळगाव,दि.28-‘कटप्पाने बाहुबलीला का मारले ?’ गेल्या दोन वर्षापासून सर्व देशवासीयांसह जळगावकरांना पडलेल्या या प्रश्नांचे उत्तर अखेर शुक्रवारी मिळाले. व्ही.एस.राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला ‘बाहुबली 2’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी जळगावच्या मल्टीप्लेक्ससह सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये ‘बाहुबली 2’ पाहण्यासाठी जळगावकरांनी मोठ-मोठय़ा रांगा लावल्या होत्या. शहरातील मल्टीप्लेस व सिंगल स्क्रीन मिळून एकुण 39 शो दाखविण्यात आले. यामध्ये सकाळचे दोन शो वगळता सर्व शो हाऊसफुल्ल झाले होते. तसेच आगामी तीन दिवसाचेदेखील शो ची आगाऊ बुकींग झाल्याने पूर्ण शो हाऊसफुल्ल झाल्याची माहिती आयनॉक्सचे संचालक वैभव शहा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
बाहुबली 1 ने मिळविलेल्या जबरदस्त यशानंतर राजामौली यांनी प्रेक्षकांसमोर गेल्या दोन वर्षापासून कटप्पाने बाहुबलीला का मारले ? हा प्रश्न निर्माण करून ‘बाहुबली 2’ ची प्रतिक्षा करायला लावली. अक्षय तृतीयेच्या दिवशी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांसोबत जळगावातील दोन मल्टीप्लेक्स दोन सिंगल स्क्रीन थिएटर मध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता असल्याने तीन दिवस आधी बुकींग सुरु केली होती. मात्र पहिल्या दोन दिवसातच आयनॉक्स व नटवर मल्टीप्लेक्सचे पहिल्या दिवसाचे सर्व शो बुक झाले होते. तसेच शुक्रवारी अनेकांना तिकीट न मिळाल्याने परत फिरावे लागले.
सिंगल स्क्रीनमध्ये प्रेक्षकांची गर्दी
मल्टीप्लेक्ससह अशोक व रिगल टॉकीज मध्ये देखील प्रेक्षकांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळ्याला. दुपारी 12 वाजेच्या शो दरम्यान अशोक टॉकीज परिसरात वाहने चालवायला देखील जागा नव्हती. तर रिगल टॉकीजमध्ये देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभराचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले होते. उन्हाळी सुट्टय़ा असल्यामुळे मुलांसह पालकवर्ग देखील चित्रपटाला गर्दी करत आहे.
आयपीएल असताना रात्रीचे शो ही हाऊसफुल्ल
गेल्या काही वर्षामध्ये एप्रिल व मे महिन्यात आयपीएल स्पर्धा असल्यामुळे कोणत्याही मोठय़ा बजेटचा चित्रपट प्रदर्शित होत नाही. मात्र ‘बाहुबली 2’ ची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये यावरुन दिसून येत आहे की, आयपीएलच्या स्पर्धा सुरु असतानाही शहरातील सर्व रात्रीचे शो हाऊसफुल्ल आहेत. आयनॉक्स मध्ये दिवसभरात 17, नटवर मध्ये 14 तर अशोक व रिगल मध्ये प्रत्येकी चार शो दाखविण्यात येत आहे. सोमवारी देखील महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याकारणाने तीन दिवस तरी अनेक प्रेक्षकांना ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? या प्रश्नाचा उत्तरासाठी वाट पहावी लागणार आहे.