लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मेहरूण तलाव परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. जास्तीचा भार सहन न झाल्याने झाडांवर येणारा ताण, लहान झाडे बकऱ्यांनी खाऊन टाकणे, त्यासोबत इतर प्रकांरानी तलावाच्या बाजूने लागलेल्या या वृक्षांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात लहान मोठी अशी जवळपास ४०० ते ५०० झाडे आहेत. या झाडांच्या संवर्धनाची मागणी पर्यावरणप्रेमी आणि परिसरातील वृक्षप्रेमींमधून होत आहे.
त्यासोबतच शहरातील बहुतेक झाडांची मनपाने किंवा स्वयंसेवी संस्थेने निगा राखण्याची गरज आहे. मेहरूण तलावाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. ती झाडे वाढली आहे. तर काही झाडे लहान आहे. या लहान झाडांना बकऱ्या किंवा इतर जनावरांकडून धोका असतो. या बकऱ्या झाडांना खाऊन टाकतात. तर काही झाडे ही या परिसरातील व्यावसायिकांकडून मुद्दाम तोडून टाकली जात आहेत.
मोठ्या झाडांवरील भार कमी करण्याची गरज
शहरात काही झाडे ही २० ते २५ वर्षे जुनी आहेत. ही झाडे पूर्ण विकसित झालेली असतात. त्यांचा भार वाढतो. त्यामुळे काही झाडांना फांद्या कापून टाकण्याची गरज असते. त्यासोबतच झाडांची निगा राखण्यासाठी शहरातील तरुणांनी किंवा एखाद्या संघटनेने प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोट - शहरातील झाडांची निगा राखणे आता गरजेचे झाले आहे. मेहरूण परिसरातील लहान झाडांना कुंपण करण्याची गरज आहे. तर मोठ्या झाडांच्या खालच्या बाजूने येणाऱ्या फांद्या कापल्या तर त्यांची उंची देखील वाढेल. त्यामुळे सावली देखील जास्त पडू शकते. - आनंद मल्हारा.