जळगाव : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविली जात आहे. नियुक्त शिक्षकांकडून प्रत्यक्ष घरोघरी फिरून माहिती गोळा केली जात आहे. मात्र, यातून शिक्षकांना कोरोना होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे ही मोहिम स्थगित करण्यात यावी, अशी मागणी आता शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १ ते १० मार्चपर्यंत विशेष शोध महिम राबविण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या़ त्यानुसार जळगाव जिल्ह्यात १ मार्चपासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधार्थ मोहिमेला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या मोहिमेला जळगाव जिल्ह्यात सुरूवातीपासूनचं शिक्षक संघटनांकडून विरोध दर्शविण्यात येत होता. एक ते दोन दिवसांपूर्वी सुध्दा विविध शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी यांना मोहिम स्थगित करण्यासाठी निवेदन दिले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २६ हजार शिक्षक आहे. यापैकी अर्धे शिक्षक या मोहिमेवर आहेत.
बालकांचा येथे घेतला जातोय शोध
जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात गजबजलेल्या वस्त्या-रेल्वे स्टेशन, बस स्थानक, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, झोपड्या, फुटपाथ, सिग्नल, लोककलावंतांची वस्ती आदी ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शहरातील काही भागांमध्ये अजूनही काही शिक्षकांनी भेटचं दिली नसल्याचे समजते.
तालुक्यांवर झाल्या बैठका
शाळाबाह्य मुलांच्या शोधार्थ मोहिमेसाठी काही दिवसांपूर्वी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक तालुक्यावर बैठक घेवून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळपासून या मोहिमेला सुरूवात होवून ६ ते १९ वयाेगटातील मुलांचा शोध घेतला जात आहे.
शिक्षक घेताहेत काळजी
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. त्यात घरोघरी जावून माहिती गोळा करावी लागत आहे. परिणामी, कोरोना होण्याची भीती नाकारता येत नसल्यामुळे गुरूवारी कोरोना विषयी काळजी घेत आहे. मात्र, तरी देखील बाधा झाल्यास यास कोण जबाबदार असणार, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.
शोध मोहिमेची जबाबदारी
- नोडल अधिकारी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी
- पर्यवेक्षक : केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षक
- प्रगणक : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका/मदतनीस