ऑनलाइन लोकमत
जळगाव,दि.4- डिजिटल पद्धतीने होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी यासाठी जनजागृती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना कॅशलेस आर्थिक व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार राज्य शासनही डिजीटल आर्थिक व्यवहारांना चालना देत आहे. जळगाव जिल्हा प्रशासनही मोठ्या प्रमाणावर डिजीटल आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भात समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रबोधन करुन जनजागृती करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सध्याच्या मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग महोत्सवाचे आयोजन शनिवार दि.7 रोजी सकाळी 10 वा. करण्यात आले आहे. शहरातील मेहरुण तलाव येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्व बॅंकांचे स्टॉल्स लावण्यात येतील.
त्या ठिकाणी मोबाईल द्वारे डिजीटल आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भात प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येईल. तसेच डिजीटल आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक मोबाईल ॲपची माहिती देणे, ते डाऊन लोड करुन देणे, केंद्रशासनाने प्रकाशित केलेले ‘भीम’ ॲपही डाऊनलोड करुन देण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. जे नागरिक डिजीटल आर्थिक व्यवहार करीत आहेत त्यांनी त्याचे पुरावे मोबाईल फोनवर दाखविल्यानंतर त्यांना पतंगही देण्यात येणार आहे.