लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन १३ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान सागर पार्क येथे करण्यात आले असून, या स्पर्धेत ३६ संघ सहभागी होणार असल्याची माहिती स्वामी समर्थ फाउण्डेशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.
मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा प्रीमियर लीगच्या आयोजनाची माहिती दिली. मनोज पाटील यांनी सांगितले की, मराठा समाज बांधव मोठ्या उत्साहाने जिल्ह्यातील समाजबांधवांसाठी मराठा प्रीमियर लीगचे आयोजन करत आहेत. ही स्पर्धा जळगाव जिल्ह्यातील समाजबांधवांसाठी खेळवली जाणार आहे.
त्यासोबतच काही सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी जळगाव शहरातील आणि पुढील वर्षी जळगाव जिल्ह्याची मराठा समाजाची तपशीलवार डिरेक्टरी तयार करण्याचे कामदेखील मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. कोरोनोच्या काळातही समाज बांधवांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत एकूण ६४ सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यात नऊ ग्रुप आहेत. पहिला सामना १३ मार्चला, तर अखेरचा सामना २४ मार्चला होणार आहे. ५४ साखळी सामने आणि १० सामने बाद फेरीचे होणार आहेत, अशी माहितीदेखील मनोज पाटील यांनी दिली.
यावेळी किरण बच्छाव, श्रीराम पाटील, प्रमोद पाटील, विजय देसाई, वासुदेव पाटील, मराठा स्पोर्ट्स फाउण्डेशनचे अध्यक्ष हिरेश कदम, राहुल पवार, विजय मराठे, दीपक पाटील, शेखर देशमुख आदी उपस्थित होते.