अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना दिवसेंदिवस वाढत असताना मृतांची संख्यादेखील वाढली आहे. मात्र, शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागाच शिल्लक नसल्याने महापालिकेने दोन दिवसांपूर्वी रात्रभरात लोकसहभागातून सात नवीन ओटे तयार करून घेतले आहेत. मात्र तरीही स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग कायम आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याआधी नेरी नाका स्मशानभूमीवर दिवसाला आठ ते दहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत दिवसाला सरासरी १४ जणांवर अंत्यसंस्कार याठिकाणी केले जात होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दर दिवसाला नेरी नाका स्मशानभूमीत सरासरी २५ ते ३० जणांवर अंत्यसंस्कार होत आहेत. विशेष म्हणजे गेल्या सात दिवसात नेरीनाका स्मशानभूमीमध्ये २१५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये ३५ कोरोनाबाधितांचा समावेश आहे.
नेरीनाका स्मशानभूमीत शहरातील केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे गॅसदाहिनी बसवण्यात आली आहे. याठिकाणी दिवसाला आठ जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. असे असतानादेखील अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या अधिक असल्याने अनेकांना प्रतीक्षेत रहावे लागत आहे. त्यात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही वेळात त्याच ठिकाणी सॅनिटायझरद्वारे फवारणी करण्यात येते यासाठीही काहीवेळ खर्ची जात आहे. त्यामुळे काहीकाळ थांबावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी लाकूड पुरवण्यासाठी खासगी मक्तेदार नेमला आहे. त्यामुळे लाकडांची कमतरता नसली तरी ओट्यांची कमतरता असल्याने याठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या सात दिवसांतील मृत्यू
७ एप्रिल - ३४
८ एप्रिल - ३९
९ एप्रिल - ३३
१० एप्रिल - ३६
११ एप्रिल - २२
१२ एप्रिल - २७
१३ एप्रिल - ३४