असं म्हणतात की, वाचन, लेखन केल्याने आपले विचार सुधारतात. नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते आणि मला असं वाटतं की, हे खरं आहे. ज्याचा त्याचा अनुभव वेगवेगळा असतो. जीवनात अनेक अनुभव येत असतात आणि त्यातून आपण खूप काही शिकत असतो. असे काही अनुभव माझ्याही आयुष्यात आले आणि मी लिहिते झाले.माझं शिक्षण मुंबईतलं. त्यामुळे जे शिक्षक आम्हाला शिकवायला होते, त्यांचा शिकवण्याचा प्रभाव माझ्यावर पडत होता. तसेच माझे आई-वडील दोन्ही सुशिक्षित असल्यामुळे वेळात वेळ काढून दोघं आम्हाला वाढण्याबरोबरच वाचनही करायचे. माझ्या वडिलांना विविध पुस्तकं वाचण्याचा छंद तर होताच; त्याचबरोबर वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवण्याचा, ताबडतोब उत्तरे लिहिण्याचा छंद होता. त्यामुळे वेगवेगळी अनेक वर्तमानपत्रं घरी आणलेली असायची. साहजिकच आमच्या डोळ्याखालून ती पुस्तकं, वर्तमानपत्र जायची.पुढे महाविद्यायाचे शिक्षण सुरू झाल्यानंतर अभ्यासाला ‘रानातल्या कविता’ हा कविता संग्रह आणि ‘नटसम्राट’ हे नाटक होतं. त्या पुस्तकांनी तर मला जणू वेडच लावलं. कॉलेजमधील शिक्षकसुद्धा खूप छान शिकवायचे. तेथील शिक्षक शिंदे अािण शिक्षिका जोशी अजूनही माझ्या स्मरणात आहेत. ते काय शिकवायचे ते उतरवून घ्यायची मला सवय होती. त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक मी ते ऐकत असायचे आणि घरी आल्यावर आणखीन सविस्तर लिहून काढायचे. त्यामुळे आपोआपच वाचनाची, लिखाणाची सवय जडली.पण खरी सवय लिखाणाची जी जडली ती लग्नानंतर ग्रॅज्युएशन पण पूर्ण झाले नाही आणि लग्न झाले. बऱ्याच वेळेला मी घरात एकटीच असायचे. एकत्र कुटुंब होतं. सर्व जण ज्याच्या त्याच्या कामासाठी बाहेर पडायचे. मी मग मला आलेले अनुभव कागदावर उतरवू लागले. असे लिहिता लिहिता एक डायरी पूर्ण भरली आणि एके दिवशी नकळत माझ्या पतीने ती वाचली. पुढे एक दिवसही कॉलेजला न जाता एम.ए. घरीच अभ्यास करून पूर्ण केले. एम.एड.केले. माझे पती म्हणाले, तुझ्या नावापुढे ‘डॉक्टर’ असे पाहायचे आहे. पीएच.डी.चा अभ्यास सुरू झाला. त्यानिमित्ताने अनेक पुस्तके वाचनात येऊन लिखाण सुरू झाले. सहा वर्षांचा कालावधी लागला पीएच.डी.ला. त्याच कालावधीत आम्ही काश्मीरला फिरायला गेलो, तेथील काही प्रसंग, त्या लोकांचे जीवन, सैनिकांचे श्रम ते माझ्या लक्षातच राहिले आणि आम्ही दोघांनी त्यावर खूप चर्चा केली. तेव्हा माझे पती म्हणाले, तू छान लिहितेस, मला माहीत आहे. हे प्रवासवर्णनही तू छान लिहू शकशील. त्यांच्या प्रोत्साहनाने मी ते प्रवासवर्णन लिहिले.ते एक प्रकारचे माझ्या लिखाणासाठी माझे पती, आई-वडिलांसोबत, शिक्षकांसोबत एक प्रेरणाच ठरली आणि अशाप्रकारे माझा लेखन प्रवास सुरू झाला....- प्रा.डॉ.सुषमा तायडे (अहिरे)
अन् अनुभवांनी लिहिते झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 4:07 PM