कोरोना लॉकडाऊन पहिल्या-दुसऱ्या लाटेचा प्रत्येकाने अनुभव घेतला. याशिवाय वेळोवेळी शासनाने परिस्थितीनुसार निर्बंध लावले. या संपूर्ण परिस्थितीची आता नागरिकांना सवय झाली असून, यासाठी मानसिकताही तयार झाली आहे. जिल्ह्यात डेल्टा व डेल्टा प्लस कोविड या विषाणूचे प्रकाराने संसर्ग झालेले काही रुग्ण आढळले. हा कोरोनाचा नवीन ट्रेन्ड वाढू नये याकरिता हे योग्य वेळेस सतर्क, सावध राहून नियमांची अंमलबजावणी केली तर नक्कीच तिसरी लाटेपासून बचाव करता येऊ शकतो या दृष्टिकोनातून शासनाने २७ तारखेपासून शनिवार, रविवार पूर्णत: बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्बंध जाहीर आहेत, मात्र निर्बंधाच्या पहिल्या दिवशी अनावश्यक वस्तूंची दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत उघडी होती, तर चारनंतर संपूर्ण बंद करण्यात आलेली होती, मात्र रविवारी भरणारा आठवडे बाजार हा बंद होता.
निर्बंधाची झाली सवय
दुसऱ्या लाटेच्या अत्यंत वाईट अनुभवानंतर कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण आटोक्यात येत असताना अचानक डेल्टाचे नवीन विषाणू समोर आले. यामुळे पुन्हा शासनाने पुढील परिस्थितीचा अंदाज घेत आताच उपाययोजना म्हणून निर्बंध लावले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत असताना नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र आता निर्बंध लादल्यामुळे व्यावसायिकही वैतागले आहे, मात्र वेळेवर निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने नियमांचे काटेकोर पालन होणे तितकेच आवश्यक आहे.
दंडात्मक कारवाईशिवाय नियमाचे पालन होतच नाही
जोपर्यंत प्रशासन दंडात्मक कारवाई करीत नाही तोपर्यंत काही टवाळखोर विनाकारण रस्त्यावर फिरणारे नियमांचे पालन करत नाही. याकरिता शासनाने दुसऱ्या लाटेनंतर ज्या पद्धतीने नाकेबंदी करून दंडात्मक कारवाई व वेळप्रसंगी गुन्हे दाखल केले होते त्याच पद्धतीने नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाल्यास नियमाचे पालन होईल, असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.
कारवाईची वेळ येऊ देऊ नका
निर्बंधाचा रविवारी पहिलाच दिवस असल्यामुळे जास्त सक्ती न करता समज देऊन अनेकांना सोडण्यात आले, मात्र सोमवारपासून कोणाचीही गय केली जाणार नाही. शहरातील चारही पोलीस ठाण्याअंतर्गत वेगवेगळी पथके लावून योग्य त्या ठिकाणी नाकेबंदी करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशी वेळ येऊ न देता सर्वांनी नियमाचे पालन करावे. यातून आपण कोरोनाला नक्कीच हरवू शकतो.
- सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी, भुसावळ