लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे. त्याच पत्त्यावर गुगल लोकेशन मध्ये रेड बलून दर्शविणे आवश्यक आहे. लोकेशन आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळून आल्यास पाल्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना करण्यात आल्या आहेत.
आरटीईतंर्गत आर्थिक दृर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्यील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जात असतो. त्यासाठी दरवर्षी आरटीईची प्रवेश पक्रिया राबविली जात असते. यंदा ३ मार्चपासून आरटीईच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ५ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. ७ एप्रिल रोजी पुण्यातून ऑनलाईन सोडत देखील काढण्यात आली. त्यात किती विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, हे गुरूवारी स्पष्ट होणार आहे. याच दिवसापासून पालकांना त्यांच्या प्रवेशाबाबतचे संदेश सुध्दा पाठविण्यात येणार आहे.
पाल्यास सोबत घेवून जावू नये
सोडत जाहीर झाल्यानंतर शिक्षण विभागाने पालकांसाठी आवश्यक सूचना केल्या आहेत. त्यात पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता. पोर्टलवर सुध्दा कधी पाल्याचा प्रवेश घ्यावयाचा आहे, याची तपासणी करावी. पोर्टलवर प्रवेशाची तारीख दर्शविली गेल्यानंतर मुदतीत पालकांनी कागदपत्र पडताळणी समितीकडे जावयाचे आहे. मात्र, त्याठिकाणी पालकांनी गर्दी करू नये व सोबत पाल्यांना घेवून जावू नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने केले आहे.
तर...पडताळणी समितीला साधा सपंर्क
पालकांनी पडताळणी समितीकडे जाताना प्रवेशाची संपूर्ण कागदपत्रे व आरटीई पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे सादर करावयाचे आहे. तसेच एकाच पालकांनी दोन अर्ज करून लॉटरी मिळविली असेल, त्यांचा सुध्दा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. दुसरीकडे निवड यादीतील बालकांना पालकांना लॉकडाउनमुळे किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जावून प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल, त्यांनी पडताळणी समितीची संपर्क साधून त्यांच्याकडे ई-मेल, व्हॉटसॲपद्वारे कागदपत्र पाठवून पडताळणी करून घेण्याचाही सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.