जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जून रोजी, जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला अनुदान आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
खडसे म्हणाले, की जिल्ह्यातील ६० टक्के उत्पादकांचा कापूस घरात आहे. सरकारने कापसाला प्रति क्विंटल किमान ६ हजार रुपये अनुदान किंवा मदत दिली पाहिजे. कांदा उत्पादक दराअभावी अडचणीत आहेत. जिल्ह्यात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री असूनही शेकडो गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यांचा स्वत:चा मतदारसंघ आणि गावदेखील यातून सुटलेले नाही. जिल्ह्यात २५ टँकर सुरू आहेत. १५० ची मागणी आहे; पण ते प्रशासनाकडून मंजूर होत नाहीत. जलजीवन मिशन योजनेत गैरव्यवहार होत आहेत. जामठीमध्ये ७०० फूट बोरिंग करूनही पाणी लागत नाही तरीही योजना मंजूर झालेली असते. पाणी नसताना कार्यादेश देण्याची घाई केली जात आहे. लक्ष्मी दर्शनाचा लाभ होईल म्हणून निविदा दिली गेली. योजनेचा आराखडा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याऐवजी गुगल मॅपच्या साहाय्याने केला जात आहे, असा आरोपही खडसे यांनी केला.
कार्यक्षम गृहमंत्र्यांनी करून दाखवावेजिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था ढासळली आहे. वाळू माफिया आहेत. २१ वेळा एसपी, आयजी, डीजी, गृहमंत्री यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. उलट हप्ते वाढतात. देवेंद्र फडणवीस कार्यक्षम गृहमंत्री आहेत. त्यांनी अवैध व्यवसाय बंद करून दाखवावेत, असे आव्हान खडसे यांनी दिले.
गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाचा वापरमुख्यमंत्र्यांना भीती आहे, की शासन आपल्या दारी उपक्रमासाठी जनता उपस्थित राहणार नाही. म्हणून शासकीय योजनांचे लाभार्थी आणा, असे अलिखित निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही आमदार खडसे यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, मंगला पाटील आदी उपस्थित होते.
बंडखोरांमुळे कोणते प्रश्न सुटले...आपल्या भागाचा विकास व्हावा म्हणून बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांसोबत गेल्याचे म्हणतात पण त्यानंतर एक वर्षात जिल्ह्याचे कोणते प्रश्न सुटले, अशी विचारणा खडसे यांनी केली. मुख्यमंत्री एकाच वर्षात चौथ्यांदा जळगाव जिल्ह्यात येत आहेत. एक तर त्यांचे जिल्ह्यावर अधिक प्रेम असेल किंवा जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी करून त्यांना मदत केली आहे असाच होतो, असेही खडसे म्हणाले.