Rohini Khadse ( Marathi News ) :रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने श्रीराम पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने भाजपला रावेर मतदारसंघात मदत होणार आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असून त्यांनी रावेरची जागा आम्हीच जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की, "प्रत्येकाला आपआपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल मत व्यक्त करणं काही गैर नाही. मात्र आम्ही हवेत गोळीबार करत नाही. थोड्या दिवसांत तुम्हाला सगळं लक्षात येईल आणि आम्ही लाखांच्या लीडने निवडून येऊ, असा आम्हाला विश्वास आहे. फक्त आता आकडेवारी सांगण्यापेक्षा आम्ही कामावर भर देतोय, आमचे उमेदवार श्रीराम पाटील हे तळागाळापर्यंत पोहोचत आहेत, संपर्क करत आहेत. ते नक्कीच चांगल्या मतांनी निवडून येतील," असा दावा रोहिणी खडसेंनी केला आहे.
संतोष चौधरी यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया
रावेर मतदारसंघात शरद पवार यांनी भाजपमधून आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे नेते संतोष चौधरी हे नाराज झाले आहेत. चौधरी यांच्या नाराजीवर बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, "संतोषभाऊ चौधरी हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. त्यामुळे त्यांची काही प्रमाणात नाराजी आहे. मात्र आम्ही सगळे त्यांना विनंती करत आहोत. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं आहे. त्यामुळे आम्ही संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढू आणि श्रीराम पाटील विजयी होतील."
दरम्यान, रावेरमधून नुकतेच पक्षात प्रवेश केलेले श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी जाहीर केली. फेब्रुवारी महिन्यात श्रीराम पाटील यांनी भाजपत प्रवेश करत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती, त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.