लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपमधून शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न कोणाकडूनही झाला. तरी आम्हाला अभिमन्यू करणाऱ्यांचे चक्रव्यूह भेदण्याची कला आमच्यातील कृष्ण-अर्जुन यांना अवगत असून, जे-जे शहराच्या विकासाच्या आड येऊन आम्हाला अभिमन्यू करतील अशांचे चक्रव्यूह भेदले जाईल, असा थेट इशारा बंडखोर नगरसेवकांच्या गटातील नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
बंडखोर नगरसेवकांना दूर ठेवण्यासाठी व त्यांच्यावर लवकरच अपात्रतेची कारवाई करण्यासाठी भाजप नेतृत्व आक्रमक आहे. अशा परिस्थितीत दोन दिवसांपूर्वी भाजप व शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, महापालिकेत बंडखोर नगरसेवकांकडून विरोध होणाऱ्या विषयांसह काही महत्त्वाचा विषयांवर सेनेला भाजप पाठिंबा देईल, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच बंडखोर नगरसेवकांपैकी काही ठरावीक नगरसेवकांना मनपापासून दूर ठेवून त्यांचा ‘अभिमन्यू’ करण्याची तयारी सुरू आहे. याबाबतच्या राजकीय चर्चा सुरू असतानाच आता बंडखोर नगरसेवकांच्या एका गटाकडून प्रसिद्धीपत्रक काढून भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे.
कौरवांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने आली ही वेळ
महापालिकेतील राजकारण आता महाभारताचे स्वरूप घेताना दिसून येत असून, ॲड. पोकळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपला अप्रत्यक्षपणे कौरवांची उपमा दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कौरवांनी पांडवांना अपमानास्पद व अन्यायकारक वागणूक दिली. त्यांना त्यांच्या न्याय्यहक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळेच महाभारतात युद्धाचा प्रसंग उभा राहिला. आता फरक एवढाच आहे की, महाभारतात पांडव ५ होते. आता मात्र ३० असून, शहराच्या विकासाकरिता नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याकरिता आपले राजकीय भविष्य पणाला लावून ठोस निर्णय घेतला असल्याचे ॲड. पोकळे यांनी स्पष्ट केले आहे. विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, कोणी कितीही बैठका घेतल्या तरी शहराचा विकास कोणी रोखू शकणार नाही, असेही ॲड. पोकळे यांनी स्पष्ट केले आहे.
अपात्रतेसाठी पाठपुरावा करण्यापेक्षा १०० कोटींसाठी केला असता तर..
भाजपचे नेते व नगरसेवक बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करत आहेत. अनेकवेळा नाशिकला चकरादेखील मारत आहेत. एवढ्याच चकरा व पाठपुरावा शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीसाठी मारल्या असत्या तर भाजपवर ही वेळ आली नसती, अशीही टीका ॲड. पोकळे यांनी भाजपवर केली आहे.