- सचिन देव
जळगाव : महावितरण प्रशासनातर्फे कृषीपंप ग्राहक वगळता इतर सर्व थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई मोहीम सुरू आहे. ज्या ग्राहकांकडे एका महिन्याच्या वीजबिलाची जरी थकबाकी असेल, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात व्यावसायिक, औद्योगिक व कृृषी पंप ग्राहकांकडे लाखोंची थकबाकी आहे. त्यांच्यावरही महावितरण प्रशासनाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात महावितरणने नागरिकांचे घरोघरी जाऊन रिडींग न घेता, त्यांनी तीन महिने सरासरी वीजबिल दिले होते. मात्र, सरासरी देण्यात आलेले वीज अवाजवी असल्याचे सांगीत, अनेक ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे महावितरणची जिल्ह्यात करोडो रुपयांची थकबाकी वाढली आहे. या थकबाकीदार ग्राहकांवर महावितरणतर्फे जानेवारी वसुली मोहीम राबवून, थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र, सर्व सामान्य नागरिकांना एका महिन्याची थकबाकी बाकी असतानाही कारवाई होत आहे. मात्र, औद्योगिक व कृषीपंप वापरणाऱ्या एका-एका ग्राहकांकडे लाखोंच्या घरात थकबाकी आहे. त्यामुळे या बड्या थकबाकीदार ग्राहकांना अभय का, त्यांच्यावरही कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
आठशे थकबाकीदारांची वीज कापलीमहावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित येत असून, गेल्या काही महिन्यात आठशे थकबाकीदारांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांनी थकबाकी भरल्यानंतर हा वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
हजारो जणांचे मीटर जप्तमहावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांचा फक्त वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून, विजेची चोरी करणाऱ्यांचे मीटर जप्त करण्यात येत आहेत. सध्या विजेची चोरी करणाऱ्यांवर दररोज कारवाई मोहीम सुरू असून, गेल्या चार महिन्यात आतापर्यंत हजारो ग्राहकांचे मीटर जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.