जळगाव : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची ४५१ ग्रामपंचायतींमध्ये १५५३ कामे सुरू आहेत. त्यात सद्यस्थितीत ९२७३ मजुरांना काम मिळत आहे. जिल्ह्यात एकूण १५०७ महसुली गावे आहेत. त्यातील ४५१ ठिकाणी ही कामे सुरू आहेत.
दुष्काळ, अकुशल मजुरांना काम मिळत नसल्याने राज्य आणि केंद्र शासनाकडून त्यांना काम उपलब्ध करून दिले जाते. त्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना (मनरेगा) याचा मोठा वाटा असतो. सध्या रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात ४५१ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू आहेत. त्यात रस्ते बांधणे इतर बांधकामे, पाझर तलाव यांची कामे केली जातात. त्यातून जिल्ह्यातील अकुशल मजुरांना रोजगार मिळतो. त्यासाठीच राज्य आणि केंद्र शासनाकडून या योजना राबवल्या जात आहेत. यात त्यांचे जॉबकार्ड बनवले जाते. जिल्हाभरात तशी अडीच लाख जॉबकार्ड आहेत. मात्र सध्या रोजगार हमीच्या कामावर फक्त ९ हजार २७३ मजूर आहेत.
सर्वात कमी मजूर मुक्ताईनगर आणि जळगाव तालुक्यात
जळगाव तालुक्यातील आसपासच्या गावात असलेल्या तरुणांना शहरात रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे सर्वात कमी मजूर हे जळगाव तालुक्यातच आहेत. सध्या जळगाव तालुक्यात फक्त ३४ ठिकाणीच काम सुरू आहे. तसेच केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातदेखील फक्त १३ ठिकाणी कामे सुरू आहेत. तर चाळीसगावमध्ये २४० आणि चोपड्यात २३२ रोहयेाची कामे सुरू आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी
अमळनेर ७०
भडगाव ५४
भुसावळ २८
चाळीसगाव २४०
चोपडा २३२
धरणगाव ३१
एरंडोल १४१
जळगाव ३४
जामनेर ६६
मुक्ताईनगर १३
पाचोरा ९९
पारोळा २२४
यावल १००