जळगाव : शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत जिल्ह्यात १४३४ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत़ त्यांना जून महिन्यात शाळेत दाखल करण्यात येणार असून दीड महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बी़जे़पाटील यांनी दिली़राज्य शासनाच्या सुचनेनुसार शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते़ यासाठी दरवर्षी प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या मदतीने दरवर्षी घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याचे नियोजन आखण्यात जाते़ तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबांतील बालकांचा शोध घेण्यात येतो़ यंदा शाळेत प्रवेश घेतला पण कायम गैरहजर राहत असलेल्या शाळाबाह्य मुलांचा सुध्दा शोध घेण्यात आला़ यामध्ये तब्बल १४३४ मुले ही शाळाबाह्य आढळून आली आहे़ विशेष म्हणजे यात पाचोरा तालुक्यात सर्वाधिक ३३० शाळाबाह्य मुलांचा समावेश आहे.विशेष प्रशिक्षण देणारशाळाबाह्य मुलांना जून महिन्यात शाळेत दाखल करण्यात येणार आहे़ त्यानंतर १५ जून ते ३१ जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे़
जळगाव जिल्ह्यात १४३४ मुले आढळली शाळाबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:00 PM