लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख २२३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून चाचण्यांचा १४ लाखांचा टप्पा पार झाला आहे. यात २३ जुलैपर्यंत एक लाख ४२ हजार ५५२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. एकूण कोरोना चाचण्यांपैकी १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असून यात अँटिजन चाचण्यांचे ९.१२ तर आरटीपीसीआर चाचण्यांमधून १२.२५ टक्के पॉझिटिव्ह अहवाल आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब असली तरी भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हावासीयांनी यापुढेही कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
‘ट्रिपल टी’वर भर
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २८ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. तेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ट्रिपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट)वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या.
३०८ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या १४ लाख २२३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांपैकी ९ लाख २८ हजार २३६ व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली असून यापैकी ८४ हजार ७३२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर ४ लाख ७१ हजार ९८७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्या पैकी ५७ हजार ८२० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच १ हजार ९०४ इतर अहवाल आढळले असून सध्या ३०८ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांनी दिली.
नियमांचे पालन करा
त्वरीत निदान, त्वरित उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी जिल्हावासीयांनी यापुढेही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.