लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. जिल्ह्यात ९८२, तर शहरात ३६३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अँटिजन तपासणीची पॉझिटिव्हीटी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे गंभीर चित्र आहे. शुक्रवारी शहरातील दोन बाधितांसह जिल्ह्यातील पाच बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रुग्णांसोबतच मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात जळगाव शहरासह भुसावळातही आता संसर्ग वेगाने वाढत आहे. भुसावळात शुक्रवारी २९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ६२६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ६८६६२ वर पोहोचली आहे. शुक्रवारी आरटीपीसीआरचे १७९३ अहवाल समोर आले. यात २०२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
अँटिजनमध्येच अधिक बाधित
२९५६ लोकांची अँटिजन चाचणी करण्यात आली असून त्यात ७८० लोक बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अँटिजनची पॉझिटिव्हिटी ही २६ टक्के नोंदविण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ही पॉझिटिव्हिटी २२ ते २६ टक्क्यांदरम्यान स्थिर असल्याने शहरात संसर्ग प्रचंड वाढल्याचे सांगितले जात आहे.
हे आहेत पाच हॉटस्पॉट
जळगाव शहर : ३६९
भुसावळ : २९८
चाळीसगाव : १३२
चोपडा : ७४
पारोळा : ४७
एकूण पॉझिटिव्हिटी
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ५ हजार ६४९ संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४ लाख ३५ हजार ४०३ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह, तर ६८ हजार ६६२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यानुसार जिल्ह्याची एकत्रित पॉझिटिव्हिटी ही ७.३६ टक्के असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
गणेश कॉलनीत विस्फोट
जळगाव शहरातील गणेश कॉलनीत एकाच कुटुंबातील ६ जणांसह ९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात शिवाजीनगर ६, खोटेनगर ६, पिंप्राळा, लक्ष्मीनगर, दादावाडी, देवेंद्रनगर या भागांत प्रत्येकी ४, तर इंद्रप्रस्थनगर येथे ३ आणि रथ चौक, भूषण कॉलनी, शांतीनगर, म्हाडा कॉलनी, सेंट्रल बँक कॉलनी, शाहूनगर या भागात प्रत्येकी २ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.