लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वर्षभर कोरोनाचा परिणाम राहिल्यानंतर आता त्यावरील लस येण्याची चर्चा सुरू असतानाच पुन्हा इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नवीन अवताराचा विषाणू पुढे आल्याने सुवर्ण बाजार अस्थिर होत आहे. लसीमुळे दर कमी होण्याची शक्यता असतानाच आता वेगळेच परिणाम होऊ लागल्याने सोमवारी चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. तर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा ५०० रुपयांनी घसरण झाली.
कोरोनाचा संसर्ग भारतात मार्च महिन्यापासून अधिक जाणवू लागला, तर विदेशात डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या काळातच पसरला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होणाऱ्या सोने-चांदीवर त्याचा अपेक्षेप्रमाणे लगेच परिणाम जाणवू लागला होता. त्यामुळे यंदाचे संपूर्ण वर्ष सुवर्ण बाजारासाठी मोठे परिणामकारक ठरले.
हंगाम नसताना दरवाढ
एरव्ही दरवर्षी जुलैपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत सोने-चांदीला मागणी नसते व या दिवसांत त्यांचे दर कमीच असतात. मात्र यंदा नेमके उलट चित्र सुवर्ण बाजारात राहिले. ऑगस्ट महिन्यातच सोने-चांदीने नवीन उच्चांक गाठला. सोने ५५ हजारांच्या पुढे तर चांदीने ७७ हजारांच्या पुढचा टप्पा गाठला. मल्टि कमोडिटी मार्केटमुळे मोठी दरवाढ होण्यास मदत झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
लसीची तयारी असल्याने दर कमी होण्याची शक्यता
कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लस शोधली जात आहे. लस आल्यानंतर सोने-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात दर कमी झाले तरी सोने ४६ हजारांच्या, तर चांदी ६० हजारांच्या खाली येणार नाही, असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ऑगस्ट महिन्यात रशियाने लसीची घोषणा करताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. हा अनुभव पाहता लस आल्यास पुन्हा दर कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र इंग्लंडमधील नवीन उद्रेकाने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. यात सोमवारी मोठी दरवाढ होऊन ७१ हजारांवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात मंगळवारी ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ७० हजार ५०० रुपयांवर आली, तर सोन्यातही ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले.
——————
कोरोनावर लस आली तरी सोन्याचे दर ४७ हजार, तर चांदीचे दर ६० हजारांच्या खाली जाणार नाही. मात्र आता पुन्हा इंग्लंडमधील उद्रेकाने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दर कसे राहतील, हे सांगणे कठीण होत आहे.
- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन