लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका हा फेब्रुवारीपर्यंत राहू शकतो, असा अंदाज शहरातील काही डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्या अंदाजानुसारच आता जिल्हाभरात फेब्रुवारीत मोठी रुग्णवाढ समोर येत आहे. यात १७ ते २४ फेब्रुवारी या आठवडाभरात १८०७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे रुग्णवाढ होत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना शांत होता. रुग्णसंख्या शंभराच्या खाली असल्याने सर्वांना दिलासा होता. यामुळे कोरोना संपलाय असाही गैरसमज झाल्याने बेफिकिरी वाढली होती. जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा दौरा, या बाबी आता रुग्ण वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. प्रशासन ॲक्शन मोडवर आलेले असून नागरिकांनी आता अधिक दक्ष राहणे गरजेचे झाले आहे. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात चार महिन्यांतील उच्चांकी वाढ नोंदविण्यात आली आहे. एकत्रित सर्वत्र कोरोना वाढत असताना जळगावात यंत्रणा पुन्हा सज्ज झाली आहे.
गंभीर रुग्ण कमी असल्याचा दिलासा
रुग्णवाढ समोर येत असली तरी यात गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. अधिकांश रुग्णांना लक्षणे नसणे, सौम्य लक्षणे असणे यामुळे हे रुग्ण होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. तज्ज्ञांच्या मते होम आयसोलेशनचे नियम न पाळल्यानेही कोरोनाचा धोका वाढत आहे.
वाढत जाणारी संख्या
आठवड्यापुर्वीचे रुग्ण : ५७७७८
२४ फेब्रुवारीचे एकत्रित रुग्ण : ५९८८५
सक्रिय रुग्णांमध्ये : १२७० ने वाढ
असा राहिला आठवडा
बुधवारी - ७४
गुरुवारी - १६९
शुक्रवारी - १५२
शनिवार - १४६
रविवार - २१६
सोमवार - ३१९
मंगळवारी - ३६३
बुधवार - ३६८
स्वतंत्र पॉइंटर
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आढळलेले रुग्ण हे पूर्ण जानेवारी महिन्यात आढळलेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहेत.
जानेवारीत आढळलेले रुग्ण : १११३
फेब्रुवारीत आढळलेले रुग्ण : १७२०
१ ते १६ फेब्रुवारीपर्यंतचे रुग्ण : ५२०
१७ ते २४ फेब्रुवारीपर्यंतचे रुग्ण : १८०७