लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, या पंधरा दिवसांच्या काळात नवीन रुग्णांची संख्या कमी झालेली नसली तरी तपासण्यांची संख्या वाढल्यामुळे नवीन रुग्ण लवकर समोर आले व गेल्या महिन्याच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण दोन टक्क्यांनी घसरले आहे. शिवाय, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही अधिक असल्याने हे एक दिलासादायक चित्र आहे.
गेल्या पंधरा दिवसानंतर १ मे रोजी प्रथमच रुग्णसंख्या १ हजाराखाली नोंदविण्यात आली होती. गेले दोन आठवडे ही संख्या १ हजारांवर स्थिर होती. मात्र, गेल्या महिन्याच्या तुलनेत गेले दोन आठवडे परिस्थिती नियंत्रणात असून बऱ्यापैकी बेडची उपलब्धता आहे. दुसरीकडे बरे होणारे रुग्ण वाढत असल्याची समाधानकारक स्थिती सर्वत्र असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
३१ मार्च ते १४ एप्रिल
टेस्टींग १, ३५, ९३३
बाधित १७,२५७
रिकव्हर १७,१०५
पॉझिटिव्हिटी : १२ टक्के
रिकव्हरी रेट एकत्रित : ८७.२२ टक्के
१५ एप्रिल ते १ मे
टेस्टींग १,७७,१५७
बाधित १८,७०८
रिकव्हरी १९,५५८
पॉझिटिव्हिटी १० टक्के
रिकव्हरी रेट एकत्रित ८९.६५ टक्के
रुग्ण वाढले मात्र, बाधितांचे प्रमाण घटले
अ) ३१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान व १५ एप्रिल ते १ मे या कालावधीतील विश्लेषण केले असता रुग्णसंख्या ही संचारबंदीच्या काळात अधिक वाढलेली आहे. मात्र, या कालावधीत ४० हजारांपर्यंत अधिक तपासण्या झालेल्या आहेत.
ब) बाधितांचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण १२ वरून १० टक्क्यांवर आले आहे. संचारबंदीचा परिणाम अजून आगामी पंधरा दिवसांनी समोर येईल, असेही काही तज्ज्ञ सांगतात.
क) संचारबंदी असली तरी तिचे पालन पूर्णत: होताना दिसत नव्हते. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी मात्र, टाळता येत नव्हती.
शहरातच अधिक रुग्ण
ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागातच अधिक रुग्ण आढळून येत आहेत. याचे कारण तपासण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात जळगाव शहरात आता दररोज साधारण १५०० तपासण्या होत आहेत. त्यामानाने जळगाव ग्रामीणमध्ये मात्र, कमी चाचण्या होत आहेत. जळगाव शहरात सरासरी १५० रुग्ण आढळून येत आहेत. तर ग्रामीण भागात सरासरी ३० रुग्ण समोर येत आहेत. मात्र, शहरात गेल्या आठवडाभरापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहेत. लॉकडाऊनमुळे शहरातील पॉझिटिव्हिटी घटली आहे. आधी ती ४० टक्यांवर होती. ती आता १० टक्क्यांवर आली आहे.