लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला मंगळवारी १६ रोजी महिना उलटला, मात्र, या महिनाभरात केवळ ५४ टक्केच आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. पंधरा टक्के कर्मचाऱ्यांना काही आजार असल्याने त्यांच्यावर लस घेण्यास बंधने आहेत. मात्र, उर्वरित कर्मचारी लसीकरणासाठी समोर येत नसल्याने महिना उलटूनही संख्या वीस हजाराच्या आतच राहिली आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली होती. लसीकरणासाठी आता २१ केंद्र आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला असून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी लसीचा गुरुवारी दुसरा डोस घेतला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणालाही सुरुवात झालेली आहे.
५५० जणांना सरासरी रोज लस दिली जाते.
१६१५२ जणांना आतापर्यंत दिली कोरोना लस
कुठल्या केंद्रावर किती लस
जीएमसी ८६, जामनेर ३०, चोपडा ३९, मुक्ताईनगर ३४, चाळीसगाव १४, पारोळा ८, भुसावळ १९, अमळनेर ३४, पाचोरा ५५, रावेर ५९, यावल ४३, गाजरे हॉस्पिटल ७५, गोल्डसिटी हॉस्पिटल ८१, भडगाव २१, बोदवड १७, एरंडोल ४४, ऑर्किड हॉस्पिटल ३८, धरणगाव ५९, डी. बी. जैन रुग्णालय १, एमडी भुसावळ २
दहा दिवसात साडेचारशे रुग्ण
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून रुग्णवाढ समोर येत असून सरासरी ५० रुग्ण आढळून येत आहेत. यात सोमवारी साडेतीन महिन्यातून प्रथमच १२४ रुग्ण आढळले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे गंभीर चित्र आहे. यात गंभीर बाब म्हणजे दहा दिवसात एकट्या शहरात २२९ रुग्ण आढळून आले आहेत आणि विशेष बाब म्हणजे हे रुग्ण संपूर्ण शहरात विविध भागात आढळून आले आहेत.
कोट
उर्वरित पंधरा टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात लस देण्याचे उद्दिष्ट आहे. कामांचा भार, पंधरा टक्के लोकांना आजार असणे यामुळे लसीकरणात अडथळे आहेत. पंधरा टक्के कर्मचाऱ्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे. लक्षणांची आताही थोडीफार भीती असल्याने लसीकरणाचा वेग संथ आहे. मात्र, तो वाढेल.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक