- अमित महाबळ
जळगाव : मुलामुलींची वयाची तिशी ओलांडण्यापूर्वी विवाह जुळणे ही आता एक मोठी समस्या बनली आहे. दोघांच्याही असलेल्या अवास्तव अपेक्षा, तडजोडीस तयार नसणे, पालकांची मानसिकता यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.
काळ बदलत गेला, मुलामुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचावला. त्यांच्या हातात लाखांच्या पॅकेजमध्ये पैसा येऊ लागला पण, एवढे असूनही विवाह न जुळणे ही एक समस्या बनली आहे. दोनही बाजूने ठेवण्यात येणाऱ्या काही अटी यामध्ये अडथळा ठरत आहेत. शेतकरी मुलांना मुलगी मिळेनाशी झाली आहे. मुलगा उच्चशिक्षित असल्यास त्याला ग्रामीण भागातील, आपल्यापेक्षा कमी शिकलेली मुलगी नको असते. मुलाचा स्वत:चा फ्लॅट मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरात असावा, अशी मुलींची अपेक्षा असते. विवाह न जमण्यात कमी पगार ही मुख्य अडचण आहे. परदेशी जाण्यास मुली आता तयार नसतात. हा एक बदल झाला आहे. मात्र, परदेशात नोकरीला असलेल्या मुलांनी काय करावे ? या प्रश्नाचे उत्तर किचकट झाले आहे. घरात सासू-सासरे नकोत ही अट काटेरी ठरत आहे.
म्हणून वाढतेय विवाहाचे वयमुलगा आणि मुलगी या दोघांच्याही काही अपेक्षा अशा असतात की, त्यामुळे त्यांचे विवाहाचे वय वाढत चालले आहे. शिक्षण, मालमत्ता, मोठ्या शहरांसाठी आग्रह, कुटुंबांतील सदस्यांची संख्या किंवा घरात सासू-सासरे नकोत आदी मुद्दे यामध्ये आहेत.
वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टरवकील, डॉक्टर असलेल्या मुला-मुलींना आपला जोडीदार समव्यावसायिक असावा, अशी अपेक्षा असते. तशी अटच त्यांच्या परिचय पत्रात टाकली जाते. अभियांत्रिकी, संशोधन क्षेत्रात शिक्षण झालेल्यांची अपेक्षा उच्चशिक्षित जोडीदार मिळावा, अशी असते.
५० टक्के तरुण तिशीपारविवाहविषयक समस्येचा धांडोळा घेताना ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण ५० टक्के तरूण तिशीपार आढळले. मुलगा असल्यास वय वर्ष २८ तर, मुलीसाठी वय वर्ष २० ते २२ नंतर पालक स्थळ पाहण्यास सुरुवात करतात.
१० टक्के चाळिशीपारयोग्य वयात विवाह न होणे ही एक मोठीच समस्या बनली आहे. वयाची तिशी उलटून जाणे ही बाब सामान्य बनली आहे. ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण १० टक्के तरूण चाळिशीपार आढळले.
अपेक्षा वाढल्या....मुला-मुलींच्या अपेक्षा खूप असतात. त्यामुळेही योग्य वयात त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. त्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा लवकर मिळत नाही. आधीच्या तुलनेत अपेक्षा खूप वाढल्या आहेत.- अजय डोहोळे
मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाहाचे वय वाढते. त्यांना मुलगी मिळत नाही. सरकारी नोकऱ्या कमी संख्येने उपलब्ध असल्या तरी त्यासाठीचा मुलींचा आग्रह कायम आहे.- लक्ष्मीकांत चौधरी
भरपूर उत्पन्न, उच्च शिक्षणाच्या अवास्तव अपेक्षा यामुळे मुला-मुलींचे विवाह जमण्यात अडथळे येतात. ज्याच्याकडे शेती कमी आहे आणि जो पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, अशा मुलांसमोरील समस्या मोठी आहे.- सुमित पाटील